विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का, रातोरात गायब झाले लाखो इन्स्टाग्राम फॉलोअर्स; कारण समोर
विराट कोहली, प्रियांका चोप्रा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायली जेनर यांसारख्या जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत अचानक मोठी घट झाली आहे. विराटचे वीस लाखांहून फॉलोअर्स कमी झाले आहेत. हे कशामुळे झालं, ते समजून घेऊयात..

विराट कोहली, प्रियांका चोप्रा, कायली जेनर, ख्रिस्तियानो रोनाल्डो हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. हे सेलिब्रिटी जसजसे त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होत गेले, तसतसा सोशल मीडियावरील त्यांचा चाहतावर्ग वाढत गेला. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा आकडा हा सेलिब्रिटींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सोशल मीडियावरील मान्यता ही एक अशी गोष्ट आहे, जी कायम राहणार आहे, असा सेलिब्रिटींचा समज असतो. पण जेव्हा ही सर्व मान्यताच पूर्णपणे बनावट आणि फसवी ठरते, तेव्हा काय होतं? एका नवीन अहवालानुसार, इन्स्टाग्रामने बनावट फॉलोअर्स आणि बॉट्स काढून टाकल्यामुळे जागतिक स्तरावरील या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने कमी झाला आहे.
इन्स्टाग्रामने रातोरात लाखो फेक अकाऊंट्स हटवल्यामुळे सेलिब्रिटींसह अनेकांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने अलीकडेच हे पाऊल उचललं आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, अमेरिकन सेलिब्रिटी कायली जेनर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सची संख्या अचानक कमी झाली आहे. सुरुवातीला हे तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचं अनेकांना वाटलं होतं. परंतु नंतर यामागील सत्य समोर आलं. मेटाने सतत्या पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून बनावटी खाती, निष्क्रिय खाती आणि बॉट्सद्वारे चालवली जाणारी खाती काढून टाकली आहेत.
🔴 Virat Kohli https://t.co/HwqEfWPMGc Instagram Follower Update
Previous : 276,367,027
Current : 274,283,312
Change : -2,083,715 (lost) in the last 2.1d#Instagram #Followers #virat.kohli #Stats pic.twitter.com/fjIxTOmMq5— Celebrity Radar (@CelebRadar0) May 6, 2026
विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील 20 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. तर प्रियांका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्याही घटली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीटीएस या के-पॉप बँडच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटने अंदाजे 70 लाख फॉलोअर्स गमावले आहेत. तर ब्लॅक पिंकच्या अकाऊंटमधून 10 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. मेटा आपल्या इन्स्टाग्राम पेजवरील विश्वासार्हता वाढवण्यासाठी बनावट खाती हटवत आहे. अनेक सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स, एजन्सी आणि कंपन्या बनावट एंगेजमेंट मिळवण्यासाठी अशा फेक अकाऊंट्सचा वापर करतात. फॉलोअर्स, लाइक्स, कमेंट्स आणि एंगेजमेंट वाढवण्यासाठी बनावट खाती किंवा बॉट खात्यांचा वापर केला जातो. इतकंच नव्हे तर अनेक लहान क्रिएटर्सच्या फॉलोअर्सच्या संख्येतही दोन ते पाच टक्क्यांची घट झाली आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या मोठ्या सेलिब्रिटींना मोठा फटका बसला आहे.