Salman Khan: कतरिनाच्या बॉडीशेमिंगवरून संतापला सलमान; त्यावर आता विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला..
सलमान खानने सेलिब्रिटींच्या ट्रोलिंगवर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता विवेक ओबेरॉयचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सलमान आणि विवेक यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे विवेकची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे.

Salman Khan: बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील जुन्या वादाची चर्चा अनेकदा होत असते. मात्र, आता एका वेगळ्या मुद्द्यावर विवेकने सलमानच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर सलमान खानने नुकताच आवाज उठवला होता. विशेषतः अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नन्सीनंतरच्या शरीरयष्टीवर झालेल्या कमेंट्सच्या पार्श्वभूमीवर सलमानने बॉडीशेमिंगवर टीका केली. आता विवेक ओबेरॉयनेही ट्रोलिंगविरोधात आपलं मत व्यक्त केलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान विवेक ओबेरॉयला सलमान खानच्या ट्रोलिंगविरोधातील वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. यावर विवेकने नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. “ट्रोलिंग करणंही योग्य नाही. ट्रोलिंग ही नकारात्मक गोष्ट आहे. आयुष्यात करण्यासाठी इतकी सकारात्मक कामं आहेत, मग नकारात्मकतेत का अडकायचं?” असं वक्तव्य विवेकने केलं. विवेकच्या या प्रतिक्रियेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे, कारण सलमान आणि विवेक यांच्यात दोन दशकांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यामुळे सलमानच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना विवेकने जुना वाद बाजूला ठेवून ट्रोलिंगसारख्या व्यापक मुद्द्यावर भाष्य केल्याचं दिसतं.
कतरिनाच्या बॉडीशेमिंगवर सलमान संतापला
‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सोशल मीडिया ट्रोलिंगवर जोरदार भाष्य केलं. अभिनेत्री कतरिना कैफचं नाव त्याने थेट घेतलं नाही; मात्र त्याच्या वक्तव्याचा संदर्भ कतरिनाच्या प्रेग्नन्सीनंतरच्या वजनावर झालेल्या ऑनलाइन टीकेशी जोडला जात आहे. कतरिना गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात दिसल्यानंतर तिच्या लूक आणि वजनावर सोशल मीडियावर कमेंट्स करण्यात आल्या होत्या.
सलमानने प्रश्न उपस्थित केला की, एखादी महिला आई झाल्यानंतर तिच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांवरून तिला ट्रोल करण्याची गरज काय? प्रेग्नन्सीनंतर वजन वाढणं स्वाभाविक असल्याचं सांगत, अभिनेत्रीला कामावर परतल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देता येईल, असंही त्याने म्हटलं. त्याचवेळी ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देऊ शकते, असं सलमानने नमूद केलं. सलमानने केवळ महिलांच्या बॉडीशेमिंगबद्दलच भाष्य केलं नाही, तर स्वतःच्या वयावर आणि लूकवर होणाऱ्या ट्रोलिंगचाही उल्लेख केला. सोशल मीडियावर त्याला ‘वय झालं’ अशा कमेंट्स केल्या जात असल्याचं त्याने सांगितलं. “तुम्ही कायम ‘मैंने प्यार किया’च्या काळात राहू शकत नाही,” अशा शब्दांत त्याने आपल्या वाढत्या वयाबाबत होणाऱ्या कमेंट्सना उत्तर दिलं.
2003 चा वाद पुन्हा चर्चेत
सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वादाची सुरुवात 2003 मध्ये झाली होती. त्या काळात विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा होती. विवेकने पत्रकार परिषद घेत सलमानकडून धमकीचे फोन आल्याचा आरोप केला होता. सलमानने हे आरोप नाकारले होते. हा वाद त्यावेळी बॉलिवूडमधील मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता विवेकने सलमानच्या ट्रोलिंगविरोधातील भूमिकेला समर्थन देत ‘नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्यावं’ असा संदेश दिला आहे.