
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत, प्रतिभावान आणि दिग्गज कलाकार. कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोन कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. अशोक सराफ यांचं सचिन यांच्या कुटुंबीयांशी जवळचं नातं निर्माण झालं होतं. हे नातं आधी सचिन यांचे वडील शरद पिळगांवकर यांच्यामुळे निर्माण झालं. पुढे शरद यांच्या निधनानंतर अशोक सराफच सचिन यांचा मोठा भाऊ आणि जवळचा मित्र बनले. ‘मी बहुरूपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. वडिलांच्या निधनानंतर सचिन यांनी स्वत:ला आणि कुटुंबाला कशापद्धतीने सावरलं, याविषयी त्यांनी या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
त्यादिवशी दुपारी अशोक सराफ यांना मोहन पाठारे यांचा फोन आला. “अशोक मामा, एक वाईट बातमी आहे. पपा पिळगांवकर गेले”, हे ऐकताच अशोक सराफ नानावटी रुग्णालयासाठी निघाले. वाटेत त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, ते म्हणजे सचिन पिळगांवकर यांचं सांत्वन कसं करायचं? कारण त्यावेळी सचिन वयानं लहान होते. आईवडील म्हणजे त्यांचं दैवत होतं. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असणार याची जाणीव अशोक सराफ यांना होती. म्हणूनच आपल्याला खंबीर राहायला हवं असं ते स्वत:ला समजावत होते.
अशोक सराफ हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा सचिन यांचा चेहरा अतिशय शांत होता. मनातल्या वादळाची समोरच्याला किंचितही जाणीव होणार नाही इतका. धाकट्या बहिणीची आणि आईची जबाबदारी आपल्यावर आहे, आपण कोलमडून चालणार नाही, हे सांगणारा. “पपांना त्या अवस्थेत पाहून मी हादरलो होतो, पण सचिन गप्प होता”, असं ते म्हणाले. ‘त्या एका दिवसात सचिन बदलला, मोठा झाला, प्रगल्भ झाला. कालपर्यंत तो त्याच्या पपांचा लाडका मुलगा होता. यापुढे मात्र त्याची भूमिका घरातल्या कर्त्या पुरुषाची असणार होती,’ असं अशोक मामांनी या आत्मचरित्रात लिहिलंय.
परंतु सचिनला कधी आधार द्यावा लागला नाही, असं ते सांगतात. शरद पिळगांवकर हे अशोक सराफ यांना आपला मुलगा मानायचे. म्हणून अशोक सराफसुद्धा त्यांना पपा म्हणायचे. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चोरावर मोर’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशोक सराफ आणि शरद पिळगांवकर यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. आमच्या वयातलं अंतर या मैत्रीच्या आड कधीच आलं नाही, असं ते अभिमानानं सांगतात.