काय करतात हे? मराठी नेत्याने विचारताच अशोक सराफ यांना आलेला भयंकर संताप
अशोक सराफ यांनी हा प्रसंग त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे. इंडस्ट्रीत बरीच नाटकं आणि गाजलेले चित्रपट केल्यानंतर त्यांना हा अनुभव आला होता. महाराष्ट्रातील एका मराठी नेत्याला अशोक सराफ माहीत नसावं, असा प्रश्न त्यांना पडला होता आणि ते भयंकर संतापले होते.

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना आजवरच्या करिअरमध्ये चाहत्यांसोबतचे अनेक प्रकारचे अनुभव आले. काहींनी त्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं, तर काहींनी त्यांना ओळखलंसुद्धा नाही. कलाविश्वात उल्लेखनीय काम केल्यानंतर आणि लोकप्रियता मिळवल्यानंतरही सेलिब्रिटींना असेही काही अनुभव येतात, जिथे त्यांना स्वत:ची ओळख नव्याने सांगावी लागते. असाच एक अनुभव अशोक सराफ यांच्याही आयुष्यात आला. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. एकदा त्यांना मुंबईत एका समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. एका राजकीय पक्षाचे पुढारी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
अशोक सराफ जेव्हा त्या कार्यक्रमाला पोहोचले, तेव्हा अध्यक्ष महाशय तिथे आलेले नव्हते. तेव्हा स्वाभाविकच सगळ्या कार्यकर्त्यांचा गराडा अशोक सराफ यांच्याभोवती जमला होता. दारं-खिडक्यांमधून लोक डोकावून बघत होते. त्यांना हटवणं कठीण झालं होतं. अखेर कार्यकर्त्यांनी अशोक सराफ यांना एका खोलीत नेऊन बसवलं. चहा-कॉफी, काय हवं नको ते विचारलं. पंधरा एक मिनिटांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. त्यांनाही अशोक सराफ यांच्याच खोलीत आणून बसवलं. तेव्हा एकाने अशोक सराफ यांची त्यांच्याशी ओळख करून दिली, ‘हे अशोक सराफ.’ त्या राजकीय नेत्यानेही अशोक सराफ यांना नमस्कार केला आणि विचारलं, ‘काय करतात हे?’ हा प्रश्न ऐकताच त्यांना भयंकर संताप आला होता.
महाराष्ट्रातल्या एका मराठी नेत्याला अशोक सराफ कोण हे माहीत नसावं? माझे चित्रपट माहीत नसतील तर एकवेळ मी समजू शकत होतो, पण नावही ऐकलेलं नाही, हे माझ्या पचनी पडलं नाही, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली. परंतु या घटनेनंतर एक मोलाची गोष्ट जाणवल्याचं ते म्हणतात. ते म्हणजे आपण आयुष्यात कितीही काहीही मिळवलं तरी पाय जमिनीवर असायला हवेत. असे प्रसंग आयुष्यात आले तरी काही प्रसंग मात्र या सगळ्यांच्या पलीकडचं सुख देणारे असतात, असंही त्यांनी सांगितलं. हा प्रसंग आशा भोसले यांनी केलेल्या कौतुकाचा होता.
‘प्रवास’ या चित्रपटाच्या एका खासगी शोला आशा भोसले आल्या होत्या. शो संपल्यावर अशोक सराफांनी त्यांनी भेट घेतली आणि नमस्कार केला. तेव्हा आशाताई त्यांना म्हणाला, “चांगलं काम केलंय तुम्ही.” इतकंच म्हणून त्या थांबल्या नाहीत. तर “तुम्ही चांगलं काम केलंय असं म्हणणं म्हणजे लता मंगेशकर चांगली गाते असं म्हणण्यासारखं आहे”, हे त्यांचंं पुढचं वाक्य ऐकून अशोक सराफ क्षणभर स्तब्धच झाले.