बाईची व्यक्तिरेखा साकारण्याबद्दल अशोक सराफ स्पष्टच म्हणाले, “फार भयंकर..”
मराठी सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु पडद्यावरील दोन गोष्टी त्यांना अजिबात आवडत नाहीत. 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सांगितलं आहे.

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. हिंदीत त्यांनी चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु मोठ्या पडद्यावर काम करताना त्यांना दोन गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे विनोदी दिसण्यासाठी वेडेवाकडे अंगविक्षेप करणं. काही वेळा केवळ विनोदनिर्मिती करण्यासाठी नायकाचा मित्र किंवा घरातला नोकर अशा व्यक्तीरेखा हिंदी चित्रपटांमध्ये दिसतात. अशोक सराफांना त्यात कधीच रस नव्हता.
अशोक सराफ यांना न आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे पडद्यावर बाईची व्यक्तीरेखा साकारणं. त्यांनी अशा व्यक्तीरेखा साकारल्या असल्या तरी त्यांना ते आवडत नाही. यामागचं कारण त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितलं आहे. “मला ते आवडत नाही, कारण ते वास्तवाला धरून वाटत नाही. पुरुषानं बाईची भूमिका करायची तर त्यासाठी पुरुषाचे फिचर, त्याची शरीरयष्टी त्याकरता साजेशी हवी. ऋषी कपूर, सचिन पिळगांवकर, रितेश देशमुख यांना बाईच्या वेशभूषेत पाहताना खटकत नाही. कारण त्यांच्या चेहऱ्यात एक देखणेपणा आहे. माझ्यासारख्यानं बाई करणं म्हणजे फार भयंकर वाटतं. मला ते कधीही पटलेलं नाही, भावलेलं तर नाहीच नाही”, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.
इतर विनोदी नटांप्रमाणेच अशोक सराफ यांनाही बाईचा रोल चुकलेला नाही. सुषमा शिरोमणी यांच्या चित्रपटात त्यांनी बाईची भूमिका साकारली. ‘हम पांच’मध्ये एका एपिसोडमध्ये त्यांनी बाईचा रोल केला आहे. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या मालिकेतही त्यांनी स्त्री पात्र साकारलं आहे. अशोक सराफ यांच्या दृष्टीने कॉमेडी हीसुद्धा गंभीरपणे करायची गोष्ट आहे. ती गंभीर चित्रपटासारखीच करायला हवी, असं ते म्हणतात. विनोदी भूमिकासुद्धा ते गंभीरपणे करतात, म्हणूनच कदाचित त्यांना स्वत:ची भूमिका पाहताना हसू आलंय असं फार कमी वेळा झालंय. हिंदी चित्रपटसृष्टीत मी फार रमलो नाही, असंही त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलंय. “मराठीमध्ये आपलं मस्त चाललंय, मी रोज शूटिंग करतोय, माझ्यासाठी भूमिका लिहिल्या जात आहेत. मग हिंदीमध्ये काम मिळावं म्हणून मरमर कशाला करायची”, असं ते म्हणाले.
