“लग्नानंतर निवेदिताला त्या कारणासाठी चांगलंच झापलेलं”; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
अशोक सराफ हे रंगभूमीवर काम करताना कडक शिस्तीचं पालन करायचे. स्टेजवर झालेल्या त्या एका चुकीमुळे त्यांनी निवेदिता सराफ यांना सुनावलं होतं. इतकंच नव्हे तर जेव्हा हीच चूक त्यांच्याकडून झाली, तेव्हा पुन्हा असं झाल्यास नाटकात काम करणं सोडून देईन, अशी शपथ त्यांनी घेतली होती.

कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली. रंगभूमीवर काम करताना ते शिस्तीबद्दल कठोर होते. अडीच तासही आपल्याला शिस्त पाळता येणार नसेल तर काय उपयोग, असं ते म्हणतात. रंगभूमी ही सवंगपणा करायची जागा नाही, हे त्यांनी मनात पक्कं करून घेतलं होतं. इतकंच नव्हे तर एखाद्या वेळेस तुमचं वाक्य चुकलं तरी चालेल, पण स्टेजवर अकारण हसणं किंवा एण्ट्री चुकणं हे पाप असल्याचं, ते मानतात. अशोक सराफ यांनी या कडक शिस्तीच्या सवयी आजवरही सोडल्या नाहीत. उशिरा एण्ट्री आणि स्टेजवर हसणं या गोष्टीला माफी नाही, असं ते स्पष्ट म्हणतात. याच कारणासाठी त्यांनी लग्नानंतर एकदा पत्नी निवेदिता सराफ यांना झापलं होतं. हा प्रसंग त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितला आहे.
त्यावेळी निवेदिता सराफ या ‘श्रीमंत’ हे नाटक करत होत्या. निवेदिता यांची एक एण्ट्री दिग्दर्शक विजय केंकरे यांनी स्क्रिप्टमधून काढून टाकली होती. त्या दृश्याची तालीम एक-दोनदाच झाली होती. त्यामुळे एका प्रयोगात चुकून निवेदिता यांनी स्टेजवर एण्ट्री घेतली. तेव्हा स्टेजवर सुधीर जोशी आणि संजय मोने होते. ऐनवेळी निवेदिता यांना पाहून काय करावं हे त्यांना कळेना. मग सुधीर यांनी स्टेजवरच निवेदिता यांना म्हटलं, “आता नाहीये तुला यायचं.” ते असं मोठ्याने म्हणताच निवेदिता पटकन हसल्या. नेमक्या त्या प्रयोगाला अशोक सराफ गेले होते. निवेदिता यांना मंचावर हसताना पाहून अशोक सराफ खूप संतापले होते.
“स्टेजवर हसायचं असेल तर काम बंद करायचं आणि घरी बसायचं. हसू आवरता येत नसेल तर नका करू काम”, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी निवेदिता यांना सुनावलं होतं. त्या घटनेनंतर कधी स्टेजवर हसू येतंय असं वाटलं तर अशोक यांचा चेहरा मी समोर आणते आणि हसू पळून जातं, असं निवेदिता सांगतात. हा प्रसंग सांगताना अशोक सराफ यांनी त्यांची चूकही मान्य केली. ‘हसतखेळत’ या नाटकादरम्यान अशाच एका प्रसंगी त्यांच्या तोंडून हसू बाहेर पडलं होतं. असा किस्सा आणखी एकदा घडल्यानंतर अशोक सराफ यांनी शपथ घेतली की “स्टेजवर पुन्हा हसलो तर नाटकात काम करणं सोडून देईन.”
