मराठीतील हे बालगीत चांगलेच गाजले, मराठी उच्चारताना आल्या अडचणी..तरीही श्रीकांत ठाकरेंनी रफींना मराठी शिकवलेच..
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी मराठीतही अनेक गाणी गायली आहेत. त्यातील अनेक गाणी श्रीकांत ठाकरे यांच्या दोस्तीतून तयार झाली आहेत. ठाकरे यांनी मोहम्मद रफींना या गाण्यासाठी मराठी भाषा शिकवली.

जादूई आवाजाचं देणं लाभलेले गायक मोहम्मद रफी साहेब आणि ठाकरे कुटुंबाचा दोस्ताना फेमस आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे यांनी संगितकार म्हणून मराठीत अनेक अवीट गोडीची गाणी दिली आहेत. अशाच एका गाण्यासाठी त्यांनी रफी साहेबांना विनंती केली. परंतू मराठीतील ‘च’ शब्दाचा उच्चार करताना अडचणी येऊ लागल्या.’चा’उच्चारताना दातांना जीभ लावा असे श्रीकांत ठाकरे यांनी रफी साहेबांना सांगितले. तरही बात काही बनत नव्हती. अखेर त्यावर उतारा म्हणून ठाकरेंनी उर्दूतील काही शब्दांचे दाखले देऊन रफी साहेबांना मराठी शिकवूनच सोडले. कोणते ते अजरामर गाणे आणि ते कसे तयार झाले हे पाहूयात…
रफी साहेबांना मराठी गाण्यांचा चस्का लागला होता. ते श्रीकांत ठाकरेंना पुढले गाणी कधी करायचं ? असे विचारायचे. मग आपण त्यांना जरा थांबा असे सांगायचो. कारण एका गायिकेच्या रेकॉर्डिंगचे उदाहरण त्यांच्या समोर होते. त्या गायिकेने वर्षाला दोन रेकॉर्ड काढायचे असे ठरवले. दुसरी आली की पहिली रेकॉर्ड्स पडायची. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या कलावंताकडून गाणी करायचे ठरल्याचे श्रीकांत ठाकरे यांनी त्यांच्या ‘जसं घडलं तसं’ पुस्तकात लिहिलेय. कधी शोभा गुर्टू तर कधी निर्मला देवी. वंदना विटणकरांना वेळ नव्हता म्हणून मग उमाकांत काणेकर यांना सोबत घेतले.
गीतकार उमाकांत काणेकर हे ठाण्याहून कधीही बोलवा ते दादरला हजर असत. ते वरळीच्या सिमेन्स कंपनीत कामाला होते. त्यांनी एक बालगीत आणले होते. त्यात ‘च’ शब्दांचा मारा होता. आता आली का पंचायत. कारण रफी साहेबांना ‘च’चा उच्चार काही केल्या जमेना. आपण रफी साहेबांना ‘चा’ म्हणताना ‘दांत को जबान लगाईये’ असे सांगितले. रफी साहेबांचा मेहुणा जहीरही ते शिकला आणि मला मराठी शिकवा म्हणू लागला. त्याला मी सांगितले तुला नंतर शिकवतो.पहले इनको सिखने दो. तेव्हा तो थांबला !
दोन्ही भाषांचे ज्ञान हवे तरच काम होईल
रेकॉर्डिंग जवळ आले आणि मी रफी साहेबांना शिकवत आलो आणि अखेर जमलं. त्यासाठी जहीन,जरुरत,जरीना, जमानत, जनाना असे अनेक उर्दू शब्दाचे दाखले देऊन त्यात ‘ज’ कसा असतो. तसाच मराठीतील ‘च’चा उच्चार असतो असे सांगितले. थोडक्यात दुसऱ्याकडून आपली भाषा गाऊन घ्यायची असेल तर दोन्ही भाषांचे ज्ञान हवे तरच काम होईल असे श्रीकांत ठाकरे यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अखेर हे बाल गीत रेकॉर्डस झाले. हे गीत होते ‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा’ जे मराठीतील एक अजरामर बालगीत ठरले आहे.