TVK Vijay : मला तमिळनाडूची मुख्यमंत्री..; थलपती विजयच्या यशानंतर त्रिशाचं वक्तव्य चर्चेत

दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तमिळनाडूची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता थलपती विजय यांच्या पक्षाच्या मोठ्या विजयानंतर तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

TVK Vijay : मला तमिळनाडूची मुख्यमंत्री..; थलपती विजयच्या यशानंतर त्रिशाचं वक्तव्य चर्चेत
Thalapathy Vijay and Trisha Krishnan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2026 | 9:11 AM

तमिळनाडूमध्ये द्रविडी राजकारणाभोवती सत्तेच्या खुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांना पछाडून अभिनेता विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ने (टीव्हीके) नवा इतिहास रचला आहे. टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय हे तमिळनाडूमध्ये किंगमेकर ठरतील, असं मानलं जात होतं. पण ते स्वत:च किंग बनले आहेत. एकीकडे सोमवारी सोशल मीडियावर राजकारणातील विजय यांच्या दमदार पदार्पणाची जोरदार चर्चा असतानाच दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनचेही व्हिडीओ आणि रील्स तुफान व्हायरल झाले. निवडणुकीच्या आधीपासूनच विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अशातच टीव्हीकेच्या या मोठ्या विजयानंतर त्रिशाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तमिळनाडूची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्रिशाची ही जुनी मुलाखत आता चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. तिने जे म्हटलं तो फक्त एक विनोद होता की त्यात काही महत्त्वपूर्ण संकेत दडलंय, असा सवाल नेटकरी करत आहेत. 2004 मध्ये ‘सन टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्रिशाला तिच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने उत्तर दिलं होतं, “मला तमिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचं आहे. खरंच! थांबा आणि बघा.. तुम्हाला दहा वर्षांत दिसेल. आधी तुम्ही सर्वजण मला मतं द्या, मग मी काय करेन ते तुम्हाला सांगेन.” त्रिशाने जरी हे वक्तव्य मस्करीत केलं असलं तरी तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या हा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

विशेष म्हणजे निकालाच्या दिवशीच त्रिशाचा वाढदिवस होता. तिने तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली होती. तिथून चेन्नईला आल्यानंतर ती थेट विजय यांच्या घरी गेली. टीव्हीकेच्या प्रचंड यशाबद्दल तिने विजय यांचं अभिनंदन केलं. त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. तर दुसरीकडे विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. संगीताने घटस्फोटाच्या याचिकेत विजय यांच्यावर एका अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ती अभिनेत्री त्रिशाच असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान विजय आणि त्रिशा एका लग्नसमारंभात एकत्र उपस्थित राहिले होते.

Follow Us