Ramayana: ‘रामायण’मधील त्या एका सीनमुळे रातोरात चर्चेत; रणबीर कपूर नाही तर या तरुणाने केली कमाल
Ramayana: रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत असताना 'रामायण'मधील भगवान विष्णूंच्या दृश्यासाठी या तरुण कलाकाराने महत्त्वपूर्ण काम केलं आहे. कोण आहे हा कलाकार आणि त्याने यापूर्वी कोणत्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय? जाणून घ्या..

Ramayana: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, चित्रपटातील भगवान विष्णूंच्या भूमिकेमागे नेमका कोणता कलाकार आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. सुरुवातीला रणबीर कपूरच भगवान विष्णूंच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या भूमिकेसाठी मोशन कॅप्चर करणाऱ्या कलाकाराचं नाव समोर आलं आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून प्रणेश सुव्वरी आहे. विशेष म्हणजे, तो या चित्रपटाच्या दिग्दर्शन टीमचाही भाग आहे.
कोण आहे प्रणेश सुव्वरी?
प्रणेश सुव्वरी हा केवळ अभिनेता नसून दिग्दर्शन आणि व्हिज्युअल आर्ट्सच्या क्षेत्रातही काम करणारा तरुण कलाकार आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात त्याने ज्युनिअर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. याशिवाय आर्ट कोऑर्डिनेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्सशी संबंधित कामातही त्याचा सहभाग होता. चित्रपटातील भगवान विष्णूंच्या दृश्यासाठी त्याने मोशन कॅप्चर परफॉर्मन्स दिला आहे. त्याच्या या कामाची चर्चा सर्वप्रथम सोशल मीडियावरील रेडिट पोस्टमुळे सुरू झाली. त्यानंतर अनेक इन्स्टाग्राम पेजवरही त्याच्याविषयी माहिती शेअर करण्यात आली.
मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारली भूमिका
मोशन कॅप्चर म्हणजे एखाद्या कलाकाराच्या शरीराच्या हालचाली आणि हावभाव रेकॉर्ड करून त्यांचा वापर डिजिटल पात्र साकारण्यासाठी केला जातो. मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ‘रामायण’मधील भगवान विष्णूंच्या दृश्यासाठी प्रणेशने याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परफॉर्मन्स दिला. विशेष म्हणजे, चित्रपटातील कुबेराच्या सेनेचाही तो भाग असल्याचं वृत्त आहे.
पहा पोस्ट-
अभिनयाचं घेतलंय प्रशिक्षण
प्रणेशने व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमधून ॲनिमेशन फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयाची आवड असल्याने त्याने बॅरी जॉन ॲक्टिंग स्टुडिओ आणि अनुपम खेर यांच्या ‘ॲक्टर प्रिपेअर्स’मधूनही अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. याशिवाय नाट्यकिरण मंच इथं थिएटरचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. एप्रिल 2026 मध्ये त्याने लंडनमधील रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समधून ॲक्टिंग फॉर कॅमेरा हा कोर्सही पूर्ण केला आहे.
‘रामायण’आधीही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम
प्रणेश सुव्वरीने यापूर्वीही काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. ‘फ्युरिओसा : अ मॅड मॅक्स सागा’, ‘सिटाडेल’ आणि ‘मास्टर्स ऑफ द एअर’ यांसारख्या प्रोजेक्ट्सशी त्याचं नाव जोडलं गेलं आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये वेव्हज समिटदरम्यान त्याने मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रावणाची भूमिका साकारण्याचा अनुभवही शेअर केला होता. त्यावेळी डीएनईजीच्या बूथवर त्याने हा प्रयोग केला होता. त्यामुळे मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाशी त्याचा आधीपासूनच जवळचा संबंध असल्याचं स्पष्ट होतं.
प्रणेशनेही दिली प्रतिक्रिया
भगवान विष्णूंच्या भूमिकेसाठी आपलं नाव चर्चेत आल्यानंतर प्रणेशने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. त्यासोबत त्याने हार्ट आणि हात जोडलेले इमोजी वापरले. चित्रपटातील त्याच्या छोट्याशा कामाचं कौतुक करणाऱ्या चाहत्यांनाही त्याने प्रतिक्रिया दिली.