
मिस पुद्दुचेरी आणि प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचलने आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलने आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये रेचलने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवलं नाही.
वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी, मानसिक आणि आर्थिक तणावाखाली असलेल्या मॉडेल आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व असलेल्या रेचलने काही दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांची भेट घेतली होती. भेटल्यानंतर काही दिवसांनंतर कथितपणे झोपेच्या गोळ्या घेऊन तिने स्वत:ला संपवले. रेचलचा मृत अवस्थेत पाहून प्रथम सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु नंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वाचा: एक्सप्रेसचे जनरल डब्बे नेहमी सुरुवातीला आणि शेवटीच का असतात? आहे खास कारण
रेचलला तातडीने जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मध्ये दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, अलीकडेच तिने लग्न केलं होतं आणि मनोरंजन उद्योगात रंगभेद व वर्णभेदाविरोधात आवाज उठवला होता. 2022 मध्ये तिला मिस पुद्दुचेरी हा किताब मिळाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेचल प्रचंड आर्थिक आणि वैयक्तिक दबावाखाली होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचललं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलीकडच्या काही महिन्यांत सॅन यांनी आपलं करिअर पुढे नेण्यासाठी काही पैसे जमा केले होते, ज्यासाठी त्यांनी आपले दागिने विकले होते. तिला वडिलांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती, परंतु वडिलांनी मदत करण्यास नकार दिला. वडिलांनी रेचलला सांगितलं की, ते त्यांच्या मुलाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांना मदत करणं शक्य नाही.
पोलिसांना सुसाइड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये रेचलने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवलं नाही. तरीही, पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये तिच्यावर वैवाहिक समस्या किंवा कोणताही दबाव होता का, याचा शोध घेतला जाईल. रेचलला केवळ आपल्या कामाने नव्हे, तर भारतीय चित्रपट आणि फॅशन उद्योगात गोऱ्या त्वचेच्या प्रचलित मानसिकतेविरोधात आवाज उठवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.