National Film Awards: गुजरातच का, महाराष्ट्र का नाही?; राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणावरून दिग्दर्शकाचा सवाल

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा यंदा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये पार पडणार आहे. यावरून दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित सवाल केला आहे.

National Film Awards: गुजरातच का, महाराष्ट्र का नाही?; राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणावरून दिग्दर्शकाचा सवाल
कार्तिक आर्यन, यामी गौतम
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2026 | 10:06 AM

National Film Awards: यंदाचा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून दिल्लीमध्ये होणारा हा प्रतिष्ठेचा सोहळा यंदा पहिल्यांदाच गुजरातमधील एकता नगर (केवडिया) इथं आयोजित करण्यात येणार आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या या सोहळ्याच्या ठिकाणावरून आता दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही या निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये झाली. त्यानंतर या पुरस्कारांचा बहुतांश सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात झाला आहे. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम दिल्लीबाहेर हलवण्याचा निर्णय विशेष ठरला आहे. 22 सप्टेंबरला एकता नगरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्यात 92 पुरस्कार विजेत्यांचा गौरव होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी गुजरातची निवड का करण्यात आली? असा सवाल केला आहे. त्यांच्या मते, भारतीय चित्रपटसृष्टीत महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि हैदराबाद यांसारख्या प्रदेशांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसारखा मोठा सोहळा या ठिकाणी का आयोजित करण्यात आला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राहुल ढोलकिया यांची पोस्ट-

‘दिल्लीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्याबद्दल माझं विशेष प्रेम नाही; मात्र हा सोहळा गुजरातमध्ये हलवण्याबाबत मला प्रश्न आहे. गुजरातच का? तुम्ही पुरस्कार सोहळा दुसऱ्या शहरात किंवा राज्यात घेऊन जाण्याची परंपरा बदलत असाल, तर मग चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एखाद्या राज्याला हा मान का देऊ नये? उदाहरणार्थ, महाराष्ट्र, केरळ किंवा तामिळनाडू. अगदी हैदराबादसारख्या शहराचाही विचार करता आला असता. मग गुजरातलाच का,’ असा सवाल त्यांनी केला.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ढोलकिया यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारकडून या सोहळ्याचं आयोजन दिल्लीऐवजी गुजरातमध्ये करण्यामागचं सविस्तर कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या निर्णयामागील नेमका हेतू काय, याबाबतही चर्चा सुरू आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल 370’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सन्मान मिळाला आहे. अभिनेत्री यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार असून, मल्याळम अभिनेते मामूट्टी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us