
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 16 ऑक्टोबरपासून हा चित्रपट नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा तिने केली आहे. या चित्रपटावरून हा वाद का होत आहे आणि हिंदुत्ववादी संघटना या चित्रपटाला इतका विरोध का करत आहेत, ते समजून घेऊयात..
मृण्मयीने जरी तिच्या चित्रपटाचं नाव ‘मनाचे श्लोक’ असं दिलं असलं तरी याच नावाने समर्थ रामदारांनी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नये, असा मुद्दा मांडला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा वादग्रस्त मुद्दा मांडण्यात आल्याचंही म्हटलं गेलंय. त्यामुळे अशा विषयाच्या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात आहे. आज ‘मनाचे श्लोक’ असं नाव देऊन त्यात लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलची कथा दाखवली, उद्या ‘ज्ञानेश्वरी’ असं चित्रपटाचं नाव देत त्यात गौतमी पाटीलला नाचवतील, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक सुनील घनवट याविषयी म्हणाले, “शतकांपासून मनाचे श्लोक हे पुस्तक लाखो लोकांना धर्म, आत्म-शिस्त आणि भक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करथ आहे. या पूजनीय धर्मग्रंथाला नफा आणि मनोरंजनाचं साधन बनवणं अस्वीकार्य आहे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.”
‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सज्जनगड इथल्या ‘समर्थ सेवा मंडळा’ने उच्च न्यायालयात केली होती. ती अमान्य झाल्यानंतर 10 ऑक्टोबरला चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये जाऊन आक्षेप घेतला आणि गोंधळ घालत शोज बंद पाडले. त्यानंर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अनेक मराठी कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दिला असून शोज बंद पाडणाऱ्यांचा तीव्र निषेध केला आहे.