
मुंबई- बिग बॉसच्या सोळाव्या पर्वात सध्या हाई-वोल्टेज ड्रामा सुरू आहे. अर्चना गौतमला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिव ठाकरेचा गळा पकडून हिंसक होणं तिला महागात पडलंय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला शोमध्ये परत आणण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे अर्चना पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्याआधी प्रेक्षकांना या घटनेवर सलमान खानच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
वीकेंड का वार या एपिसोडचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खान हा शिव ठाकरेचा पर्दाफाश करताना दिसणार आहे. नेमकं काय घडलं, काय खरं आणि काय खोटं याचा खुलासा भाईजान अर्थात सलमान करणार आहे. किचनमध्ये दोघांमध्ये भांडण होण्याआधीच शिव ठाकरेने त्याच्या टीम मेंबर्ससोबत अर्चनाला चिडवण्याचा प्लान केला होता.
“मला अर्चनाचा ट्रिगर पॉईंट माहितीये. पार्टी, इलेक्शन आणि दीदीचा उल्लेख केला की ती चिडते. दीदी तुला उभीसुद्धा करणार नाही, असं म्हटल्यावर तिला राग येईल”, असं शिव म्हणतो. या चर्चेनंतरच अर्चना आणि टीना यांच्या वादात शिव उडी घेतो. त्यानंतर मोठा गोंधळ होतो.
शिव ठाकरे हा अर्चनाला दीदी दीदी म्हणून चिडवू लागतो. हे ऐकून अर्चनाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती रागाच्या भरात शिवचा गळा पकडते. याच हिंसेमुळे अर्चनाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.
वीकेंड का वार या एपिसोडमध्ये सलमान खान हा अर्चनाला घरात परत आणू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. घराबाहेर पडल्यापासून अर्चनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही. मात्र तिला सलमानची साथ नक्कीच मिळाली आहे.