झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे; गायक बुडताना मॅनेजर गात होता ‘जाबो दे, जाबो दे’ गाणं

Zubeen Garg : आसामचा प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. झुबीनच्या बँडमधील एका सदस्याने त्याच्या मॅनेजरबद्दल नवीन खुलासा केला आहे. सिंगापूरमध्ये झुबीन पाण्यात बुडत असताना मॅनेजर 'जाबो दे' असं ओरडत होता, असं त्याने सांगितलं.

झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे; गायक बुडताना मॅनेजर गात होता जाबो दे, जाबो दे गाणं
zubeen garg
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 4:26 PM

प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता झुबीनचा चुलत भाऊ संदीपन याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आसाम राज्याची सीआयडी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सिंगापूरमध्ये होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी झुबीन गेला होता.

झुबीनचा भाऊ संदीपन हा पोलीस सेवेत कार्यरत असून तोसुद्धा सिंगापूरला त्याच्यासोबत गेला होता. झुबीनच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल सिंगापूरच्या रुग्णालयाने शवविच्छेदनानंतर दिला होता. याप्रकरणी झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, संगीतकार शेखरज्योती गोस्वामी, गायक अमृतप्रवा महंता, चुलत भाऊ संदीपन गर्ग आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता यांना अटक करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये झुबीनच्या शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला वगळता इतर सात जणांनी सीआयडीच्या समन्सला अद्याप प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली.

यॉटवर झुबीनसोबत उपस्थित असलेल्या 11 जणांपैकी आठ जणांना सीआयडीने समन्स बजावले होते. याआधी झुबीनचा बँड मेंबर शेखरज्योती गोस्वामी याने त्याचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंता यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या दोघांनी झुबीनला विष दिल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला होता. इतकंच नव्हे तर समुद्रात जेव्हा झुबीन श्वास घेण्यासाठी तडफडत होता, तेव्हा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा हा ‘जाबो दे, जाबो दे’ (जाऊ दे, जाऊ दे) असं ओरडत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं मिळवलेल्या अत्यंत संवेदनशील कागदपत्रांनुसार, गोस्वामीने असाही दावा केला आहे की झुबीनच्या मृत्यूचं षडयंत्र रचलं गेलं होतं. हा मृत्यू एखादा अपघात वाटावा, या दृष्टीने हे षडयंत्र रचलं गेलं होतं.