
Zubeen Garg’s Last Wish : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर माझ्या अस्थी ब्रह्मपुत्रा नदीत विसर्जित कराव्यात, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली होती. ‘या अली’ गाण्यामुळे लोकप्रिय झालेला प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर रोजी अचानक निधन झालं. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाला. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तो तिथे गेला होता. झुबीनच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. देशभरातील चाहते सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच झुबीनची ही जुनी मुलाखत चर्चेत आली आहे.
जानेवारी 2025 मध्ये दिलेल्या मुलाखतीत झुबीनने त्याला त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस कुठे आणि कसा घालवायचा आहे, याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, “मी वेडा आहे. मला माझ्याकडे असलेलं सर्वकाही लोकांना द्यायचं आहे. स्वत:साठी काही ठेवायचं नाहीये. मी असाही आनंदी आहे. माझा स्वत:चा स्टुडिओ आहे, माझं घर आहे. मला माझे शेवटचे क्षण टिल्लामध्ये घालवायचे आहेत. हे ठिकाण महाबहू ब्रह्मपुत्र रिव्हर हेरिटेज केंद्रात आहे. ही खूप चांगली जागा आहे. ही सर्वांत चांगल्या स्थळांपैकी एक आहे. तिथे एक छोटासा बंगला असेल. मी तिथेच राहीन आणि तिथेच अखेरचा श्वास घेईन. जेव्हा माझं निधन होईल, तेव्हा लोकांनी तिथेच माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत किंवा मला ब्रह्मपुत्रा नदीत वहावं. मी एक शिपाई आहे. मी रॅम्बोसारखा आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, झुबीन गर्गला सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान समुद्रात श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्याला सिंगापूरमधील जनरल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शनिवारी झुबीनचं पार्थिव विमानाने गुवाहाटीला आणण्यात आलं. त्यावेळी विमानतळावर त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.