तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचा वाढतो आहे धोका, त्यामुळे तुमच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या,…आणि ही आहेत त्याची लक्षणे

| Updated on: Mar 04, 2022 | 6:23 PM

पचनसंस्थेत बिघाड झाला की, पोटाच्या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि इतर समस्या तुम्हाला छळू लागतात. आणि मोठ्या आतड्यातील जळजळीने कोलन कॅन्सरची सुरुवात होते.

तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचा वाढतो आहे धोका, त्यामुळे तुमच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या,...आणि ही आहेत त्याची लक्षणे
colon cancer
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः काही माणसं पोटदुखी कितीही असली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे हे कधी कधी अंगलट येऊ शकते. आणि पोटामधील समस्या (Stomach Problems) दीर्घकाळ राहिली तर त्याचा परिणाम कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो. मेडिकलच्या (Medical) भाषेत याला कोलन कॅन्सर (Colon Cancer) असे संबोधले जाते. हा कर्करोग मोठ्या आतड्यात (कोलन) किंवा गुदाशयात होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे कोलन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असते. कोलन कॅन्सर हा बरा होऊ शकतो मात्र वेळेवर निदान न केल्यामुळे, हा कर्करोग जगभरात लाखो लोकांचा बळी घेतो.

जर तुम्हाला पोटदुखी, मूळव्याध, स्टूलमध्ये रक्त किंवा बद्धकोष्ठता असेल तर ही कोलन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने उपचार घ्या आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीराबाबतच्या निष्काळजीपणामुळे या समस्या घातक ठरु शकतात.

पोटदुखीच्या तक्रारी धोकादायक

या कोलन कॅन्सरविषयी माहिती सांगताना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील यकृत आणि गॅस्ट्रोलॉजी विभागप्रमुख सांगतात की, कोलन कर्करोग होण्याचे कोणतेही विशिष्ट कारण नाही. ज्यांना ज्यांना बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा अनेकदा पोटदुखीच्या तक्रारी जाणवतात त्यांना याचा मोठा धोका असतो.

सहज उपचार केले जाऊ शकतात…

तज्ञांच्या मते कोलन कॅन्सरचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये डाव्या बाजूला आणि दुसऱ्या उजव्या बाजूला कर्करोग होतो. डाव्या बाजूच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये पोटदुखी आणि गुदाशयात रक्त येण्याचा त्रास संभवत असतो. या रोगाची ही लक्षणे असली तरी यामध्ये उलट्या किंवा थकवा येत नाही, तर उजव्या बाजूच्या कर्करोगामुळे थकवा, अशक्तपणा येतो. काही तज्ञांच्या मते हा कर्करोग अनुवांशिकही असू शकतो. या कर्करोगाची सुरुवात आतड्यातील गाठीपासून आणि ही गाठ वेळीच आढळून आली तर त्याच्यावर सहज उपचार केले जाऊ शकतात.

तुलनेत तरुण लोकांमध्येच हा कॅन्सर

कोलन कॅन्सरचे प्रमाण आता तरुणांमध्येही आता आढळून येऊ लागले आहे, ते अधिकाअधिक वाढतच चालले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण लोकांमध्ये हा कॅन्सर झाला तर त्याच्यावर उपचार करणे खपू कठीण गोष्ट आहे. कोलन कॅन्सर हा रोग 45 वर्षानंतर होण्याची जास्त शक्यता असते, मात्र आता कोरोनाच्या महामारीमुळे 35 वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची भीती आता वाढू लागली आहे. कारण पोटाच्या समस्येवर जास्त रुग्ण आता तरुणांमध्येच आहेत.

नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास

पचनसंस्थेतील बिघाडामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, वेदना किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. कोलन कॅन्सरची सुरुवात मोठ्या आतड्याच्या हळूहळू होणाऱ्या जळजळीने होते. यामुळे पीडित व्यक्तीला आतड्यांसंबंधी सतत त्रास होत राहतो. अशा व्यक्तीला नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होत राहतो. या रोगाच्या दिसणाऱ्या लक्षणांकडे लोकं दुर्लक्ष करतात, त्यामुळे भविष्यात व्यक्तीला कोलन कॅन्सर होण्याची लक्षणं जास्त असतात.

चुकीचा आहार टाळा

आपल्या पोटाचे विकार वाढू लागतात त्याचे मूळ कारण असते आपण घेत असलेला चुकीचा आहार. त्यामुळे कोलन कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची काळीज गांभीर्याने घेतली गेली पाहिजे. तुम्ही घेत असलेल्या आहारात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमी करा. तुम्ही सतत जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खात असाल ते वर्ज्य करा. फळे, हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारची व्हिटॅमिन तुमच्या आहारात कशी समाविष्ठ करत असाल ते नक्कीच फायदेशीर होईल. दारु आणि धुम्रपान करत असाल तर तेही टाळा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करा.

संबंधित बातम्या

कोरोनाची चौथी लाट 22 जूनपासून, IIT कानपूरमधील संशोधकांच्या अभ्यासातून निष्कर्ष समोर

‘या’ 7 पध्दतींनी वजन करा कमी, शरीराला होतील भरपूर फायदे

चिंता नको… आता ‘या’ घरगुती उपायांनी काढा कपड्यांवरील डाग…