रात्री मोबाईल उशाजवळ ठेवून झोपता? सावधान, यामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
रात्री उशीरापर्यंत फोन पाहिल्याने कॅन्सरचा धोका वाढतो, ब्रेन ट्युमरचा देखील धोका बळावतो. डॉक्टरांनी दिली संपूर्ण माहिती

रात्री झोपताना मोबाईल हातात घेऊन स्क्रोलिंग करायच, मस्त रिल्स बघायचे.. .आणि डोळे मिटायला लागले कि फोन उशाच्या बाजूला ठेवून तसंच झोपायचं. ही सवय आता कॉमन झाली आहे. मोबाईल बघितल्याशिवाय झोपच लागत नाही, अशी अवस्था अनेकांची झाली आहे. पण तुमची हीच सवय कॅन्सरचा धोका वाढवू शकतो.
कॅन्सर या आजाराचे नाव जरी काढले तरी अनेकांना धडकी भरते. बाकी कोणतेही आजार चालतील पण कॅन्सर नको रे बाबा अशी अनेकांची अवस्था असते. परंतु तुमची झोपण्यापूर्वीची ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. कॅन्सर स्पेशलिस्ट डॉ. तरंग कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल उशाशी ठेवून झोपणे हे धोक्याचे आहे. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि कॅन्सर तसेच ब्रेन ट्युमर यांसारख्या भयानक आजाराची लागण होते.
उशीखाली फोन ठेवून झोपताय ?
रात्री मोबाईल वापरून झाल्यानंतर तो उशाजवळ किंवा बेडवरच ठेवण्याची अनेकांना सवय असते. फोन जवळ ठेवला की रात्री नोटिफिकेशन पाहण्यापासून ते सोशल मीडियावर रात्रभर अॅटिव्ह राहणे हे सगळ सुरूच असतं. यामुळे कॅन्सर बळावतो तसेच ब्रेन ट्युमरचा देखील धोका वाढण्याची शक्यता असते.
फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे झोपेचीही वाट लागते
रात्रीच्या वेळेस फोनमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात. ज्याचा परिणाम झोपेवर होतो.मोबाईलमधून निघणाऱ्या या ब्लू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मेंदू हायपरअॅक्टिव्ह राहतो. त्यामुळे लवकर झोप येत नाही आणि झोपेची वाट लागते याचा संपूर्ण परिणाम आरोग्यावर होतो.
कॅन्सरपासून वाचण्यासाठी काय करावे?
डॉक्टरांनी रात्री झोपण्यापूर्वी फोनपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी फोन वापरणे बंद करा. त्याऐवजी पुस्तक वाचणे, कुटुंबाशी किंवा मित्रांशी गप्पा मारणे, मुलांसोबत खेळणे, झोपण्यापूर्वी मोकळ्या हवेत फेरफटका मारून येणे यासारख्या गोष्टी करू शकता.
वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.