
Unhealthy Food : दिवसभर आपले पोट कसे राहील हे सकाळी उठल्यावर आपण काय खातो, यावर अवलंबून असते. असे बराच पदार्थ आहेत जे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी (Empty stomach) खाल्यास त्रास होऊ शकतो. पचनक्रियेवर परिणाम होऊ शकेल, अशा काही पदार्थांचे सेवन केल्यास पोटाच्या (Stomach problems) समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, गॅस, मळमळणे, अॅसिडिटी असे अनेक त्रास सहन करावे लागू शकतात. दरवेळेस गोळ्या , औषधे घेण्यापेक्षा सकाळचं खाणं किंवा नाश्ता विचारपूर्वक करायची सवय लावणे , कधीही चांगले नाही का? त्यामुळे उपाशीपोटी काही ठराविक पदार्थ खाणे (Avoid these food iems in morning) टाळल्यास दिवसभर पोट चांगले राहील आणि तब्येतीच्या विशेषत: पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागणार नाही.
रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणे टाळावे :
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. रिकाम्या पोटी प्रक्रिया केलेल्या साखरचे पदार्थ खाल्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कारण साखरेच्या पदार्थांमुळे यकृतावरील ताण वाढतो. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी गोड फळं किंवा स्मूदी तसेच चॉकलेट खाणे टाळावे.
योग्य वेळी योग्य प्रमाणात फळं खाल्ल्यास ती शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. मात्र सकाळी उठल्यावर पोट रिकामे असताना आंबट फळं खाल्यास पोटातील ॲसिड वाढू शकते. त्याशिवाय फळांमध्ये असलेले जास्त प्रमाणातील फायबर आणि फ्रुक्टोस यांच्यामुळे पचन क्रियेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकाळी आंबट फळे, विशेषत: संत्री व पेरू, खाणे टाळावे.
जे लोक डाएटिंग करतात ते बऱ्याच वेळेस आपल्या दिवसाची सुरूवात कच्चा भाज्या खाऊन करतात. मात्र या भाज्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते व ते खाल्यामुळे ओव्हरलोड होऊ शकतो. रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाल्यास पोटदुखी होऊ शकते. या भाज्यांमध्ये टोमॅटोचाही समावेश आहे. रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्यास पोटात अॅसिडिक रिॲक्शन होऊ लागते. तसेच पोटात गॅस तयार होणे, पोट दुखणे, वेदना होणे आणि पेटके होणे, हे सर्व त्रासही टोमॅटोच्या सेवनामुळे होऊ शकतात.
रिकाम्या पोटी मसालेदार, तिखट पदार्थ खाल्यास पोटाचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे ॲसिडिक रिॲक्शन होतो आणि पोटात पेटके येण्यास सुरूवात होते. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे अपचनही होऊ शकते. त्यामुळे सकाळी अंशपोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
जगभरात अनेक लोक सकाळी उठल्यावर एक कप चहा किंवा कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. मात्र हे पोटासाठी योग्य नाही. सकाळी उठल्यावर ताजतवानं वाटावं, झोपेमुळे आलेली मरगळ जावी यासाठी अनेक जण कॉफी किंवा चहा पितात, मात्र रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास ॲसिडिटी होते. बऱ्याच लोकांना त्यामुळे गॅसेसचा त्रासही होतो.
(टीप – या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)