मिठाईपासून फराळापर्यंत… सणासुदीत खाण्याच्या या चुका टाळा, अन्यथा होऊ शकते फूड पॉइझनिंग
सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मात्र, दूषित अन्न किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

दिवाळी म्हटली की घराघरांत गोडधोड पदार्थ, मिठाई आणि वेगवेगळ्या प्रकारचा फराळ तयार केला जातो. या काळात बाजारपेठांमध्येही मिठाई आणि खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र, सणाच्या आनंदात खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. दूषित अन्न, भेसळयुक्त मिठाई किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीत आवडीचे पदार्थ खाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
फूड पॉइझनिंग होण्याची कारणे
सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशावेळी काही पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक केली जात नाही. बराच वेळ उघड्यावर ठेवलेले अन्न, दूषित पाणी, भेसळयुक्त मिठाई आणि खराब झालेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होऊ शकते. याशिवाय जेवण्यापूर्वी हात न धुणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अस्वच्छ भांड्यांचा वापर करणे यामुळेही अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो.
फूड पॉइझनिंगची लक्षणे
फूड पॉइझनिंग झाल्यानंतर पोटदुखी, पोटात मुरडा येणे, मळमळ आणि उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय वारंवार जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसतात. उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
खाद्यपदार्थ साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा
शिजवलेले अन्न खोलीच्या सामान्य तापमानात दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये. वातावरणातील तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास अन्न एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवावे. उरलेले अन्न व्यवस्थित झाकून फ्रिजमध्ये साठवावे आणि पुन्हा खाण्यापूर्वी चांगले गरम करून घ्यावे. अन्नाचा वास किंवा चव बदलली असल्यास ते खाणे टाळावे. तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवावेत.
स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी आणि खाद्यपदार्थ कापण्याची साधने स्वच्छ असावीत. कच्चे मांस आणि भाज्या कापण्यासाठी वेगवेगळ्या कटिंग बोर्डचा वापर करावा. तसेच पिण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा वापर करावा.
फूड पॉइझनिंग झाल्यास काय करावे?
फूड पॉइझनिंग झाल्यास उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. अशावेळी पुरेसे पाणी प्यावे आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस घ्यावे. हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा. तसेच शरीराला पुरेशी विश्रांती द्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत. वारंवार उलट्या होणे, शौचातून रक्त येणे, जास्त ताप येणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.