AQI खराब असेल तर मॉर्निंग वॉक करावा की नाही? जाणून घ्या योग्य पद्धत
हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्यास मॉर्निंग वॉकला जाणे आरोग्यासाठी योग्य ठरतेच असे नाही. खराब AQI असताना सकाळी फिरायला जाणे सुरक्षित आहे का, याबाबत मॉर्निंग वॉक करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या.

सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे अनेकांच्या रूटीनचा भाग असतं. नियमित चालण्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि आरोग्यालाही फायदा होतो. मात्र, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले असेल तर सकाळी फिरायला जाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. प्रदूषित हवेमुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI तपासणे महत्त्वाचे आहे. खराब AQI असताना कोणती काळजी घ्यावी आणि व्यायाम कसा करावा, जाणून घेऊया.
बाहेर पडण्यापूर्वी AQI तपासा
मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी आपल्या परिसरातील AQI तपासा. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्यास बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.
पहाटेची वेळ नेहमीच योग्य नसते
पहाटेची हवा स्वच्छ असते, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हिवाळ्यात प्रदूषित हवा जमिनीलगत साचून राहू शकते. त्यामुळे केवळ वेळ पाहून बाहेर पडण्याऐवजी त्या वेळचा AQI तपासावा.
योग्य जागा निवडा
मॉर्निंग वॉकसाठी वाहतुकीची वर्दळ, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे आणि धुळीचे रस्ते टाळावेत. शक्यतो वाहनांच्या धुरापासून दूर असलेल्या जागी फिरायला जावे.
वेगाने चालणे टाळा
प्रदूषण जास्त असताना धावणे, जॉगिंग किंवा वेगाने चालणे टाळावे. अशा व्यायामामुळे श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो आणि शरीरात अधिक प्रदूषित हवा जाऊ शकते.
श्वसनविकार असणाऱ्यांनी काळजी घ्या
अस्थमा किंवा सीओपीडीसारखे आजार असणाऱ्यांना प्रदूषणामुळे खोकला, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी बाहेर व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या
प्रदूषणाचा परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर अधिक होऊ शकतो. त्यामुळे AQI खराब असताना त्यांना बाहेर फिरायला नेणे किंवा खेळायला पाठवणे टाळावे.
त्रास जाणवल्यास चालणे थांबवा
मॉर्निंग वॉक करताना खोकला, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास लगेच चालणे थांबवावे. त्रास कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
घरातच व्यायाम करा
हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्यास बाहेर जाण्याऐवजी घरातच व्यायाम करावा. ट्रेडमिलवर चालणे, स्टेशनरी सायकल किंवा हलका व्यायाम असे पर्याय निवडता येतात. त्यामुळे प्रदूषित हवेचा संपर्क टाळून शरीराची हालचाल कायम ठेवता येते.