वांग्याचे केवळ फायदे माहीत आहेत? आता तोटेही जाणून घ्या… ‘हा’ त्रास असेल तर वांग्याकडे बघूही नका !

वांगं ही अतिशय फायदेशीर भाजी आहे. वांग्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो, पण काही प्रकरणांमध्ये वांग्याच्या सेवनाने नुकसान होऊ शकते.

वांग्याचे केवळ फायदे माहीत आहेत? आता तोटेही जाणून घ्या... हा त्रास असेल तर वांग्याकडे बघूही नका !
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 31, 2023 | 11:30 AM

नवी दिल्ली – वांग्याची भाजी खायला बहुतांश लोकांना आवडते. कधी साधी भाजी, कधी भरलं वांगं तर कधी वांग्याचं भरीत किंवा एखादवेळेस वांग्याचे कापही तोंडाला चव आणतात. वांगं हे (eggplant) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि इतर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. एक कप वांगी 20 कॅलरी ऊर्जा देऊ शकतात. वांग्यात 4.82 ग्रॅम प्रोटीन आणि 2.46 ग्रॅम फायबर असते, जे पचनसंस्थेसाठी (good for digestion) खूप फायदेशीर मानले जाते. वांग्यांमध्ये कर्करोगाशी लढणारे कंपाऊंडही आढळतात. वांग्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते. रक्तातील साखरेची पातळीही कमी (blood sugar level)होण्यास मदत होते.

मात्र इतके फायदेशीर असूनही वांग्याचे काही तोटेही आहेत. वांगं खाण्यामुळे होणारे तोटे फार कमी असतात, तरीही वांग्याचे जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर काही नुकसान होऊ शकते. काही लोकांसाठी वांग्याचे सेवन फायदेशीर ठरत नाही. ज्या लोकांना हे आजार आहेत ,त्यांनी चुकूनही वांगं खाऊ नये, अन्यथा त्यांची प्रकृती बिघडू शकते.

या लोकांनी वांग्याचे सेवन टाळावे

1) ॲलर्जी – एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी असेल तर त्यांनी वांगी खाणे टाळावे. वांग्यामधील काही घटकांमुळे ॲलर्जी वाढू शकते. असा स्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे, सूज येणे आणि खाज सुटणे असा त्रास होऊ शकतो.

2) किडनी स्टोन – ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी वांगं चुकूनही खाऊ नये. याचे कारण म्हणजे वांग्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वांग्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. यावर अद्याप फारसे संशोधन झालेले नसले तरी तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वांग्याचे सेवन करा.

3) लोहाची कमतरता – वांग्याच्या सालीमध्ये नासुनिन नावाचे रसायन आढळते जे अँथोसायनिन असते. हे लोहासह बांधले जाते आणि पेशींमधून (ते) काढून टाकते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ते लोह कमी करते. यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते.

4) विषारी घटक – वांग्यात सोलानाईन नावाचे नैसर्गिक विष आढळते. बटाटे आणि टोमॅटोमध्येही सोलानाईन आढळते. तुम्ही जास्त वांगी खाल्ल्यास या विषाचा परिणाम होऊ शकतो, पण त्याचा परिणाम होईलच याची शाश्वती नाही. फार कमी लोकांवर या विषाचा परिणाम होतो. अशा स्थितीत वांगी खाल्ल्यानंतर उलट्या होणे, मळमळ होणे आणि झोपेचा त्रास जाणवत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.