तुमचा मेंदू पूर्णपणे थकलाय हे कसं ओळखाल? अजिबात दुर्लक्ष करु नका ही 5 लक्षणं

आजच्या वेगवान जीवनात शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा अनेकांना सतावत आहे. पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवणे, नकारात्मक विचार आणि चिडचिड होणे ही मानसिक थकव्याची लक्षणे कशी ओळखावीत, यावरील सविस्तर रिपोर्ट.

तुमचा मेंदू पूर्णपणे थकलाय हे कसं ओळखाल? अजिबात दुर्लक्ष करु नका ही 5 लक्षणं
mental health
| Updated on: Jun 11, 2026 | 3:03 PM

आजच्या आधुनिक आणि वेगवान आयुष्यात शारीरिक आरोग्याइतकीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. मात्र, सध्या अनेक लोकांना शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा (Mental Fatigue) जास्त सतावताना दिसत आहे. सततचा कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे, आर्थिक चिंता आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे अनेक जण मानसिकरित्या खचून जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आपण मानसिक थकव्याचे शिकार झालो आहोत, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.

तज्ज्ञांच्या मते, हा थकवा वेळीच ओळखला नाही, तर त्याचे रूपांतर गंभीर नैराश्यात होऊ शकते. मेंदू आणि मनाची थकलेली अवस्था ओळखण्यासाठी काही ठळक लक्षणे मदत करू शकतात.

मानसिक थकवा ओळखण्याची ५ प्रमुख लक्षणे:

७-८ तासांच्या झोपेनंतरही थकवा कायम: अनेकदा रात्री पुरेशी म्हणजे ७ ते ८ तासांची झोप घेऊनही सकाळी उठल्यावर व्यक्तीला ताजेतवाने वाटत नाही. शरीर आणि मन सकाळीही तणावग्रस्त असते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मेंदू सतत चिंतेत असतो, तेव्हा तो गाढ विश्रांतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत राहतो.

नकारात्मक विचार येणं: मानसिकदृष्ट्या थकलेली व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहू लागते. “माझ्या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही” किंवा “माझ्या आयुष्यात काहीच चांगले घडणार नाही”, अशी भावना मनात घर करते. दीर्घकालीन तणावामुळे विचारांवर नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो.

आवडत्या गोष्टींमधील रस कमी होणे: ज्या गोष्टींमुळे पूर्वी आनंद मिळायचा, जसे की संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे, मित्रांसोबत वेळ घालवणे किंवा प्रवास करणे त्या गोष्टींपासून व्यक्ती दूर जाऊ लागते. मानसिक थकवा वाढल्याने माणूस स्वतःला एकांतात कोंडून घेण्याचा प्रयत्न करतो.

कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण: मानसिक थकव्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे ऑफिसचे काम, अभ्यास किंवा घरगुती जबाबदाऱ्यांवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. मन सतत विचलित होते. तसेच छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याचे प्रमाण वाढते.

क्षुल्लक गोष्टींवरून तीव्र राग येणे: मनाची सहनशीलता संपल्यामुळे व्यक्तीचा संयम सुटतो. घरातील एखादी छोटीशी चूक, कामाला झालेला किरकोळ विलंब किंवा रस्त्यावरील ट्रॅफिक अशा अगदी सामान्य कारणांवरूनही व्यक्तीचा तीव्र संताप होतो. तसेच चिडचिड वाढते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us