रशियातील कोरोनाची लस घेण्यासाठी ‘ही’ अट; नागरिकांना सक्तीच्या सूचना

जगात सर्वाधिक मद्याचे सेवन करणाऱ्या देशांमध्ये रशियाचा वरचा क्रमांक लागतो. | Russia Sputnik V Vaccine

रशियातील कोरोनाची लस घेण्यासाठी ही अट; नागरिकांना सक्तीच्या सूचना
| Edited By: | Updated on: Dec 10, 2020 | 8:28 AM

मॉस्को: कोरोना विषाणूवर मात करणाऱ्या रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V Vaccine) या लशीविषयी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाकडून ही लस नागरिकांना टोचण्यास प्रारंभ केला होता. या दरम्यान डॉक्टरांकडून संबधित नागरिकांना एक महत्त्वाची सूचना दिली जात आहे. यामुळे मद्यप्रेमींची मोठी निराशा होण्याची शक्यता आहे. (Alcohol prohibited after vaccination Russia Sputnik V Vaccine)

ही लस टोचल्यानंतर किमान दोन महिने मद्याचे (Alcohol) सेवन करु नये, अशा सूचना रशियातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा (Tatiana Golikova) यांनी यासंदर्भात माहिती दिली. स्पुटनिक व्ही या लशीचा योग्य परिमाण साधला जाण्यासाठी 42 दिवस योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. लस घेतलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच मद्य आणि ड्रग्जचे सेवन टाळणे गरजेचे आहे, असे तातियाना गोलिकोवा यांनी सांगितले.

मद्यसेवनात रशियाचा जगात चौथा क्रमांक

जगात सर्वाधिक मद्याचे सेवन करणाऱ्या देशांमध्ये रशियाचा वरचा क्रमांक लागतो. एका अहवालानुसार जगातील 14 टक्के मद्याचा खप एकट्या रशियात होतो. रशियातील मद्यसेवन करणारे लोक वर्षाला सरासरी 15.1 लीटर दारू रिचवतात.

रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत गेल्या आठवड्यापासून लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत देशातील एक लाख लोकांना Sputnik V Vaccine लस देण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व भागांमध्ये लसीकरण पार पडेल, असा विश्वास उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा यांनी व्यक्त केला.

Sputnik V Vaccine ही लस कोरोनावर 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी आहे. मात्र, लस घेतलेल्या काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही नुकतीच समोर आली होती. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही लस टोचून घेण्यास नकार दिल्याचेही समजते.

संबंधित बातम्या:

ब्रिटननंतर कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?

(Alcohol prohibited after vaccination Russia Sputnik V Vaccine)