Healthy Heart: हे पदार्थ बनू शकतात तुमच्या हृदयाचे शत्रू, सेवन करणे टाळा

| Updated on: Dec 30, 2022 | 1:12 PM

हृदय हे आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण आजकालची व्यस्त जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य व हानिकारक सवयींमुळे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्या आहाराकडे नीट लक्ष देऊन त्यात बदल केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखता येऊ शकते.

Healthy Heart: हे पदार्थ बनू शकतात तुमच्या हृदयाचे शत्रू, सेवन करणे टाळा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आपल्याला चांगलं व स्वस्थ आयुष्य हवं असेल तर हृदयाची नीट (heart care) काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हृदय हे आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. बदलत्या काळानुसार निरोगी हृदय राखणे (healthy heart) अधिक महत्त्वाचे बनले आहे. मात्र आजकालची व्यस्त जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य व हानिकारक सवयी तसेच लठ्ठपणा, धूम्रपान , मद्यपान या सर्वांचा परिणाम शरीरावर होताना दिसतो आणि हृदयविकाराचा (heart disease) धोका वाढतो. हृदयाशी संबंधित आजारांच्या बाबतीत, अन्नपदार्थ देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

काही पदार्थ खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, तर अनेक गोष्टींचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर कोणचे पदार्थ खाणे टाळावे, हे जाणून घेऊया.

1) सोडा पिऊ नका

हे सुद्धा वाचा

सोडा अथवा सोडायुक्त पेय ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसतात. त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते. नियमितपणे सोडा प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळेच अधिक प्रमाणात सोडा प्यालल्यास ते हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच सोडा अथवा सोडायुक्त पेयांचे सेवन करणे टाळावे.

2) लाल मांस खाणे टाळावे

लाल मांसामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल, मीठ, सॅच्युरेटेड फॅट हे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी लाल मांस न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

3) पिझ्झाचे सेवन हृदयासाठी हानिकारक

आपल्यापैकी बहुतांश लोकांना पिझ्झा खायला खूप आवडतं पण तो आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात फॅट्स आणि सोडिअम असते. ज्यामुळे धमनी ब्लॉक होऊ शकते. म्हणूनच जर तुम्हीही पिझ्झा खाण्याचे शौकीन असाल तर आजपासूनच त्याचे सेवन पूर्णपणे बंद करा.

4) बेक्ड पदार्थही नुकसानदायक

बऱ्याच वेळेस लोक छोट्या भुकेसाठी कुकीज, बिस्कीट्स, केक, मफीन असे पदार्थ खातात. पण हे बेक केलेले पदार्थही हृदयाच्या दृष्टीने धोकादायकच असतात. अशा पदार्थांमध्ये मैदा असतो तसेच साखर खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे आपले वजन वाढू शकते, जे हृदयासाठी चांगले ठरत नाही.

5) अतिरिक्त मीठ टाळा

जर तुम्हालाही प्रत्येक पदार्थ खाताना वरतून मीठ घालून घ्यायची सवय असेल तर हे खूप धोकादायक आहे. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, जे हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच मीठाचे एका ठराविक प्रमाणातच सेवन करणे योग्य ठरते. स्वस्थ हृदय हवे असेल तर काही पथ्यं पाळणं गरजेचं ठरतं.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)