Health : हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅकमध्ये फरक कोणता? जाणून घ्या…

| Updated on: Jul 27, 2023 | 5:25 PM

पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक यातील नेमका फरक या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. याबाबत डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी फरक सांगितला आहे.

Health : हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅकमध्ये फरक कोणता? जाणून घ्या...
warning signs before heart attack
Follow us on

मुंबई : बहुसंख्य लोक पॅनिक अॅटॅकला हृदयविकाराचा झटका समजतात. मात्र पॅनीक अटॅक आणि हृदयविकाराचा झटका हे दोन्ही भिन्न असून त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरु शकते. पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक यातील नेमका फरक या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. याबाबत डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी फरक सांगितला आहे.

हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणे :

जेव्हा हृदयाला आवश्यक प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी ब्लॉक झाल्यावर रक्तपुरवठ्यासंबंधी अडचणी येऊन हृदयविकाराचा झटका येतो. छातीत दुखणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे जाणवणे, छातीत धडधडणे, अशक्तपणा येणे, खुप घाम येणे, अंग थंड पडणे, जबडा, मान आणि खांदे दुखणे, दम लागणे, मळमळणे , उलटी होणे आणि थकवा जाणवणे ही सामान्य हृदयविकाराची लक्षणे आहेत. हृदयविकाराचा झटका धोकादायक आहे आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

पॅनिक अॅटॅकची लक्षणे :

एखाद्या व्यक्तीला चिंता किंवा कोणत्याही प्रकारची भीती वाटू लागली, तर त्याला पॅनिक अ‍ॅटॅक येऊ शकतो. पॅनीक अॅटॅक धोकादायक नसतात, परंतु ते तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेत तसेच संपुर्ण आरोग्याच्या कार्यात व्यत्यय आणतात. ज्या लोकांना नियमित किंवा वारंवार पॅनीक अटॅक येत येतात त्यांना पॅनिक डिसऑर्डर हा एक प्रकारचा चिंतेचा विकार उद्भवू शकतो. अचानक चिंता आणि भीती वाटणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, थरथरणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे ही लक्षणे आहेत.

हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅकमध्ये फरक कोणता?

जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळी हात, जबडा, मान यासारख्या इतर भागातही वेदना जाणवतात. पॅनीक अटॅकच्यावेळी, वेदना फक्त छातीत जाणवते. शारीरिक श्रमानंतर हृदयविकाराचा झटका येतो आणि तणावामुळे पॅनीक अॅटॅक येतो. व्यायाम केल्यानंतर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पॅनीक अटॅक नाही. जर एखाद्याला छातीत दुखत असेल किंवा इतर लक्षणे नसतील आणि पॅनिक अटॅक नसेल तर तो हृदयविकाराचा झटका असू शकतो.

पॅनिक अॅटॅक काही काळासाठी देखील असू शकतो आणि एखाद्याला त्यानंतर बरे वाटु शकते. परंतु हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही काही काळातच वाढू शकतात आणि संबंधीत व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. चिंता, नैराश्य किंवा दीर्घकालीन ताणतणाव असलेल्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका ही एक मेडिकल ईमर्जन्सी आहे आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे महत्वाचे ठरते.