Acidity: ॲसिडिटी का होते ? जाणून घ्या लक्षणे व उपचार

| Updated on: Nov 16, 2022 | 2:46 PM

आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याची लक्षणे जाणून घेऊन वेळीच उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

Acidity: ॲसिडिटी का होते ? जाणून घ्या लक्षणे व उपचार
Follow us on

नवी दिल्ली – जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी (acidity)असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ (burning sensation) होणे अशी लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली (bad lifestyle) यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना अन्ननलिकेत वेदना होणे तसेच जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे अशी लक्षणे जाणवतात. तर काही वेळा त्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास देखील होतो. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

काय आहेत ॲसिडिटीची लक्षणे ?

– पोटात जळजळ होणे

– घशात जळजळणे

– अस्वस्थ वाटणे

– आंबट ढेकर येत राहणे

– तोंडाची चव जाणे

– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.

कशामुळे होतो ॲसिडिटी ?

1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे

2) धूम्रपान व मद्यपान करणे

3) ताणतणाव

4) पोटाचे आजार

कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?

– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.

– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.

– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.

– अन्न चावून चावून सावकाश खावे.

– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.

– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

– गरज नसताना औषधे घेणे टाळावे.