World Cancer Day 2023 : कॅन्सरच्या या ‘सायलेंट’ लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक टाळा, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

| Updated on: Feb 04, 2023 | 9:37 AM

कॅन्सर हा एक असा आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. कॅन्सरच्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

World Cancer Day 2023 : कॅन्सरच्या या सायलेंट लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक टाळा, अन्यथा करावा लागेल पश्चाताप
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – दरवर्षी 4फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day) साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कॅन्सर (cancer) हे जगभरातील मृत्यूचे (death) दुसरे प्रमुख कारण आहे. यामुळे केवळ 2018 साली मध्ये 9.6 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलोरेक्टल, पोट आणि यकृताचा कॅन्सर हे पुरुषांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य कॅन्सरआहेत. तर, स्तन (breast cancer) , कोलोरेक्टल, फुफ्फुस, ग्रीवा आणि थायरॉईड कॅन्सर महिलांमध्ये सामान्य आहेत.

कॅन्सरचे लवकर निदान होणे आणि त्यावर उपचार हाच कॅन्सर टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. नियमित तपासणी करून वेळेत निदान केले जाऊ शकते. तथापि, रुग्णाला त्याची लक्षणे देखील जाणवू शकतात.

4 फेब्रुवारी रोजी का साजरा करण्यात येतो कॅन्सर डे ?

हे सुद्धा वाचा

जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने 1933 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पहिला कॅन्सर डे साजरा करण्यात आला. तेव्हापासून, दरवर्षी कॅन्सर डे च्या दिवशी एक नवीन थीम प्रसिद्ध केली जाते. सर्वसामान्य व्यक्तींना कॅन्सरच्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबाबत माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे. कॅन्सरबाबत अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की तो स्पर्शानेही पसरतो. त्यामुळे लोक कॅन्सरच्या रूग्णांवर चांगले उपचार करत नाहीत. पण तसे अजिबात नाही, उलट हा समजू पूर्णपणे चुकीचा आहे.

कॅन्सरची काही लक्षणे

चामखीळीत दृश्यमान बदल होणे

शरीरावरील चामखीळीचा आकार, लांबी किंवा रुंदी किंवा रंग यामध्ये बदल असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामागे मेलेनोमा असू शकतो, जो त्वचेच्याचा एक गंभीर प्रकार आहे.

लघवीतून रक्त येणे

लघवीतून रक्त येणे हे मूत्राशयाच्या कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण आहे. या स्थितीला वैद्यकीय भाषेत हेमॅटुरिया म्हणतात. यामुळे सहसा वेदना होत नाही. मात्र, लघवीतून रक्त येणे हे देखील प्रोस्टेट कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक आहे

आतड्यांसंबंधी सवयींमध्ये बदल

आतड्याच्या कॅन्सरबाबतीत रुग्णाला अनेक लक्षणे दिसून येतात, त्यापैकी एक म्हणजे आतड्यांसंबंधी सवयींमध्ये वारंवार बदलहोणे. यामुळे, रुग्णाला अनेक वेळा शौचालयात जावे लागते. लघवी अथवा शौचासोबत रक्तही येऊ शकते.

शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे अथवा सूज येणे

अंगावर अचानक गाठ येणे गंभीर असू शकते. मात्र शरीरावरील प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते, पण जर ही गाठ मोठी, कडक,स्पर्शाने वेदना न होणारी नसेल किंवा सूज आली असेल तर हे रोगाचे लक्षण असू शकते. कॅन्सरच्या गाठीचा आकार वेळोवेळी वाढतो, जो तुम्हाला स्पर्श करून जाणवू शकतो. ती गाठ पाय आणि हात तसेच स्तन, अंडकोष किंवा मानेवर देखील दिसू शकते.

अचानक वजन कमी होणे

एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर त्याचे वजन विनाकारण अचानक कमी होऊ लागते. हे देखील या आजाराचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

सतत खोकला

तुमच्या खोकल्याची अनेक कारणे असू शकतात. व्हायरल इन्फेक्शन, दमा, सीओपीडी किंवा गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लेक्समुळेही रुग्णाला सतत खोकला होतो. तथापि, फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे गंभीर आणि सतत त्रासदायत खोकला देखील होऊ शकतो. काही वेळाने तुमचा घसा साफ झाल्यासारखे वाटेल. जेव्हा कॅन्सरची स्टेज वाढते, तेव्हा खोकल्यावर तोंडातून रक्त किंवा केशरी रंगाचा कफ बाहेर येऊ शकतो.

गिळताना त्रास होणे

जर एखाद्या व्यक्तीला अन्न गिळताना त्रास होत असेल तर त्याला डिस्फॅगियाचा त्रास होऊ शकतो. या प्रकारची स्थिती त्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिसून येते, ज्यांच्या मानेचा ट्यूमर वाढत आहे. यामुळे ब्लॉकेज होऊ शकते.

वेदना आणि अस्वस्थता

अनेक आठवडे आणि महिने होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. विशेषतः त्याचे कारण समजत नसेल तर तातडीने डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करून घ्यावी.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)