World Diabetes Day 2026 : टाइप-2 डायबिटीज होण्यामागे आहेत ‘ही’ प्रमुख कारणं; वेळीच ओळखा धोका!
Type 2 Diabetes Reasons : टाइप-२ मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आरोग्यविषयक प्रश्न बनला आहे. सुरुवातीला याची लक्षणे सहज लक्षात येत नसल्याने अनेकांना या आजाराची माहिती उशिरा मिळते. टाइप-२ मधुमेह होण्याची प्रमुख कारणे कोणती ते जाणून घेऊया.

मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. पूर्वी प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. विशेषतः टाइप-२ डायबिटीजचे प्रमाण वाढण्यामागे बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दैनंदिन दिनक्रमातील अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. या आजाराचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढण्यामागे कोणत्या तीन प्रमुख गोष्टींचा सहभाग असतो, जाणून घेऊया.
आजकाल अनेक जण कामाच्या व्यापामुळे किंवा आळसामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. दिवसभर एकाच जागी बसून काम करणे आणि शारीरिक हालचाली कमी असणे याचा आरोग्यावर परिणाम होतो. नियमित व्यायाम न केल्यामुळे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे कठीण होऊन टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढू शकतो.
सतत तणावात राहणे
तणावाचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच नाही, तर शारीरिक आरोग्यावरही होतो. सतत तणावात राहिल्यामुळे शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत बदल होऊ शकतात. याचा परिणाम रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ तणाव राहिल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
जास्त साखर खाणे
गोड पदार्थ खाण्याची अनेकांना आवड असते. मात्र, कुकीज, केक, चॉकलेट्स आणि इतर गोड पदार्थांचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी योग्य नाही. याशिवाय रिफाइंड पदार्थांमधूनही शरीराला अतिरिक्त साखर मिळू शकते. अशा पदार्थांचे जास्त सेवन केल्यास वजन वाढण्यासह टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.
महत्त्वाची टीप: या सवयींमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो; मात्र त्यांपैकी एखादी सवय म्हणजे मधुमेह होणारच असे नाही. मधुमेह होण्यामागे आनुवंशिकता, वय आणि इतर आरोग्यविषयक घटकांचाही सहभाग असू शकतो.