XBB.1.16 व्हेरिएंट ठरू शकतो कोरोना वाढण्यास कारणीभूत, पण…. एम्सच्या डॉ गुलेरियांचा इशारा

| Updated on: Mar 23, 2023 | 9:06 AM

XBB.1.16 : साधा ताप आला तरी त्याला हलक्यात घेऊन दुर्लक्ष करू नका. वेळ न घालवता अँटीजन चाचणी करून घ्यावी.

XBB.1.16 व्हेरिएंट ठरू शकतो कोरोना वाढण्यास कारणीभूत, पण.... एम्सच्या डॉ गुलेरियांचा इशारा
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) दिल्लीचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या सांगण्यानुसार, कोविड 19 चा XBB.1.16 हा नवा व्हेरिएंट कोरोनाच्या (corona) नव्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकतो. मात्र असे असले तरीही घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांच्या जीवाला नगण्य धोका असतो, असेही डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसात देशात कोरोनाचा कहर वाढत चालला (corona cases are increasing) असून रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे.

नॅशनल कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेले गुलेरिया म्हणाले, “जोपर्यंत या प्रकारच्या विषाणूंमुळे गंभीर आजार, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका निर्माण होत नाही तोपर्यंत काही हरकत नाही कारण सौम्य रोगापासून लोकांना काही प्रमाणात प्रतिकारक्षमता मिळते.”

पंतप्रधान मोदींनी महत्वपूर्ण घेतली बैठक

कोविडच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेतली. चाचण्या वाढवा, मास्कर वापरा, रुग्णालयांनी वेळोवेळी मॉकड्रील करावे अशा महत्वपूर्ण सूचना पंतप्रधानांनी आरोग्य यंत्रणेला केल्या असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूची 1,134 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी गेल्या 138 दिवसांतील सर्वाधिक आहे. नवीन प्रकरणे आल्यानंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 7,026 वर पोहोचली आहे.

डॉ. गुलेरिया यांच्या मते, हा विषाणू काळासोबत बदलत राहतो. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉनचे अनेक प्रकार लक्षात आले. पण चांगली गोष्ट म्हणजे तो पूर्वीइतका वेगाने बदलत नाहीये. मात्र XBB.1.16 प्रकरणे वेगाने वाढू शकतात कारण लोक पूर्वीसारखे सतर्क दिसत नाहीत. लोकांनी चाचण्या करण्यापासून मोठ्या प्रमाणात स्वतःला दूर केले आहे.

ताप, सर्दी-खोकला हलक्यात घेऊ नका

डॉ. गुलेरिया यांच्या सांगण्यानुसार, आता ताप, खोकला आणि सर्दी होऊनही लोकांची तपासणी होत नाही. काही लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेतली तरी, व्हायरसची पुष्टी झाल्यानंतरही ते याबद्दल सांगत नाहीत. तुमच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास विलंब न करता त्याबाबत माहिती द्यावी, कारण यामुळे सरकारला योग्य आकडे कळण्यास मदत होईल व त्यानुसार रणनीती आखताता येईल, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला. तसेच कोणताही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्वरित उपचार करावे, असेही त्यांनी नमूद केले.