Yoga Tips: मनातील नकारात्मक विचार दूर करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासनं, दिवसभर राहाल फ्रेश

Confidence Boosting Yoga: योगासन फक्त आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवत नाही तर ते आपला आत्मविश्वास देखील वाढवतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती योगासनं रोज केली पाहिजेच हे जाणून घ्या.

Yoga Tips: मनातील नकारात्मक विचार दूर करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासनं, दिवसभर राहाल फ्रेश
| Edited By: | Updated on: Nov 20, 2026 | 11:15 AM

आजच्या धावपळीच्या जीवनात वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही आव्हान स्वीकारणे आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाणे सोपे होते. मात्र, अनेकदा अपयश, सततचा ताण किंवा इतरांशी तुलना करण्याच्या सवयीमुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशा वेळी मनात नकारात्मक विचार येतात आणि चिंता वाढू शकते. स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्यासाठी आणि मन स्थिर ठेवण्यासाठी योगासनांचा सराव फायदेशीर ठरू शकतो. नियमित योगाभ्यासामुळे शरीरासोबतच मनालाही बळ मिळते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी ही योगासने आपल्या रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करू शकता.

वृक्षासन

Loading...

वृक्षासन हे शरीराचा तोल आणि एकाग्रता सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. या आसनात एका पायावर उभे राहून दुसऱ्या पायाचा तळवा मांडीच्या आतील बाजूला ठेवला जातो आणि दोन्ही हात डोक्यावर जोडले जातात. या स्थितीत शरीराचा समतोल राखण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे मन स्थिर ठेवण्यास आणि विचारांमध्ये स्पष्टता आणण्यास मदत होते. वृक्षासनाच्या नियमित सरावामुळे शरीराची ठेवण सुधारण्यासोबतच पाय, नितंब, मांड्या आणि गुडघ्यांचे स्नायू मजबूत होतात. शरीराचा तोल सांभाळण्याचा सराव केल्याने स्वतःवरील विश्वास वाढण्यासही मदत होते.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या योगस्थितींचा समावेश असल्याने शरीराच्या अनेक स्नायूंना चालना मिळते. नियमित सराव केल्याने शरीराची लवचिकता वाढण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच शरीर सक्रिय राहते आणि आळस दूर होण्यास हातभार लागतो. सूर्यनमस्कार करताना श्वास आणि शरीराच्या हालचाली यांचा समन्वय साधावा लागतो. त्यामुळे मन शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होऊ शकते. नियमित सरावामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळते.

ताडासन

ताडासन हे शरीराची ठेवण आणि संतुलन सुधारण्यासाठी महत्त्वाचे आसन आहे. हे आसन करताना दोन्ही पायांवर समान भार देऊन सरळ उभे राहावे आणि शरीर ताठ ठेवावे. हात वर उचलून शरीराला वरच्या दिशेने ताण दिल्याने स्नायूंना ताण मिळतो. या आसनामुळे शरीराची स्थिती सुधारण्यास मदत होते. ताडासनाच्या नियमित सरावामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते. आसन करताना श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते. शरीर ताठ ठेवून उभे राहण्याची सवय आत्मविश्वास वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us