मुंबईतील 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती, जगभरात खळबळ, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची हॉटेलच्या खिडक्यांवर याचना

| Updated on: Dec 12, 2022 | 6:15 PM

अफगाणिस्तानच्या काबूल शहरात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय.

मुंबईतील 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती, जगभरात खळबळ, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची हॉटेलच्या खिडक्यांवर याचना
Follow us on

काबूल : मुंबईतला 26/11 हल्ला कुणीही विसरु शकत नाही. तशाच हल्ल्यासारखा भयानक दहशतवादी हल्ला आज अफगाणिस्तानच्या काबूल शहरात झालाय. दहशतवाद्यांकडून प्रचंड गोळीबार सुरुय. त्यामुळे हॉटेलमध्ये खळबळ उडालीय. अनेक नागरिक हॉटेलच्या खिडक्यांमधून मदतीचीसाठी याचना करत आहेत. अनेकजण जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावत आहेत. हॉटेलमधील काही दृष्य कॅमेऱ्यात टीपली गेली आहेत. त्यातून घटना किती भयानक आहे याची प्रचिती येतेय. नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. पोलिसांकडून सर्वोतोपरी नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी चारही बाजूंनी हॉटेलला घेरलंय. या धक्कादायक घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

अफगाणिस्तानच्या काबूल शहरात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. दहशतवाद्यांनी काबूलमधील शहर-ए-नवा या हॉटेलवर निशाणा साधलाय. या हॉटेलला चायनीज हॉटेल असंही संबोधलं जातं. कारण या हॉटेलमध्ये वरिष्ठ चिनी अधिकारी, व्यापारी नेहमी येत-जात असतात.

हे सुद्धा वाचा

अतिरेकी या हॉटेलमध्ये गोळीबार करत आत शिरले. तिथे त्यांनी प्रचंड हिंसाचार केला. विशेष म्हणजे हा गोळीबार अद्यापही सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण अफगाणिस्तान देशासह जगातील विविध भागांमध्ये खळबळ उडाली आहे.

हल्लेखोर दहशतवादी नेमके कोण आहेत? त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस, सुरक्षा यंत्रणा घटनास्थळाकडे रवाना झालीय. हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरुय. या घटनेत जीवितहानी झालीय का याबाबत स्पष्ट अशी माहिती आलेली नाही. पण हल्ला अतिशय भयानक असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले. हल्लेखोरांकडून हॉटेलमध्ये असलेल्या नागरिकांना तिथेच कैद करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, हॉटेलच्या एका खिडकीतून आगीचे मोठमोठे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाकडे जाणारे रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत.

 

काबूलमध्ये वारंवार दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत असतात. याआधी आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानच्या दूतावासावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात राजदूत उबेदूर रहमान निजमानी यांच्यावर गोळीबार झाला होता. पण तिथे उपस्थित असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने पुढे येत गोळी अंगावर घेतली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता आणि उबेदूर यांचा जीव वाचला होता.