
बांगलादेशातील जे घडलं ते काही जगासाठी नवं नाही. याआधी श्रीलंकामध्ये देखील अशीच परिस्थिती होती. आंदोलन हिंसक झाल्यानंतर सत्तापालट झाला. बांगलादेशमध्ये ही परिस्थिती असतानाच आता पाकिस्तानातही सरकारविरोधात बंडाची ठिणगी पडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सरकारला अल्टिमेटम देखील देण्यात आलाय. बांगलादेशानंतर पाकिस्तानात अराजकता माजणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांसाठी संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तान स्टुडंट फेडरेशनने (PSF) माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ३० ऑगस्टपर्यंत सुटका करण्याची मागणी केली आहे. यासाठी स्टुडंट फेडरेशनने पाकिस्तान सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान हे निर्दोष असून त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता पाकिस्तानात देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान स्टुडंट फेडरेशनची (पीएसएफ) इम्रान खान यांनी त्वरीत तुरुंगातून बाहेर काढण्याची मागणी केलीये. बांगलादेशच्या आंदोलनानंतर पाकिस्तानी तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही मानले जाते.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका न केल्यास आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास पाकिस्तानमध्ये देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा पीएसएफने सरकारला दिलाय. या आंदोलनांमुळे पाकिस्तानमध्ये सुरू असलेला राजकीय तणावही लक्षणीय वाढणार आहे. पीएसएफच्या इशाऱ्यानंतर सरकार काही मोठी कारवाई करू शकते.
वृत्तांनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून मोठी घोषणा केली आहे. 9 मेच्या दंगलीबाबत पीटीआयवरील आरोप सिद्ध झाल्यास माफी मागण्यास तयार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. 9 मेच्या दंगलीनंतरही आपल्याशी गैरवर्तन झाल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन पेटलं. कोटा आरक्षणावरुन हे आंदोलन सुरु झाले होते. पण याचा परिणाम इतका मोठा होईल असा विचार शेख हसीना यांनी केला नसेल. शेख हसीना यांना हे आंदोलन हाताळण्यात अपयश आलं. आंदोलन पेटलं आणि त्यांना लष्कर प्रमुखांनी राजीनामा देण्यास सांगितले. राजीनामा दिल्यानंतर त्यांना देश देखील सोडावा लागला. देश सोडल्यानंतर ही परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. अजूनही काही ठिकाणी आंदोलन सुरु आहे. आज बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर देशात परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.