
एक राष्ट्रपती आणि एका धनाढ्याची मैत्री का तुटली?. भूतकाळात दडलेली काही रहस्य आता हळू-हळू बाहेर येऊ लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या नात्यात कडवटपणा आला आहे. मस्क आपल्या मित्राचे तारुण्याच्या दिवसातील सिक्रेट सार्वजनिक करु लागले आहेत. टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी सांगितलं की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव जेफरी एपस्टिन फाइल्समध्ये आहे. याच कारणामुळे ही फाइल अती गोपनीय फाइल्सच्या कॅटेगरीत येते, ती अजून सार्वजनिक केलेली नाही, असं संकेत मस्क यांनी दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचं नातं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. दोघांच्या नात्याची वाटचाल शत्रुत्वाच्या दिशेने सुरु झालीय. या भांडणात आता जेफरी एपस्टिनच नाव आलय. कदाचित तुम्हाला हे नाव माहित नसेल. कोण आहेत हे जेफरी एपस्टिन? आणि काय आहे जेफरी एपस्टिन फाइल्स?. या फाइल्समध्ये ट्रम्पच नाव येणं का मोठी बाब आहे?.
एलॉन मस्कने एक्सवर एक पोस्ट केलीय. “खरच आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आलीय. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एपस्टीन फाइल्समध्ये आहे. याच कारणामुळे या फाइल्स सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत. तुमचा दिवस शुभ ठरो, DJT” कोण आहेत हे जेफरी एपस्टिन?. ज्यांचं नाव घेऊन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात वादळ आणण्याचे संकेत दिले आहेत.
कोण होता जेफरी एपस्टिन?
जेफरी एपस्टिन हा अमेरिकेतील एक मोठा अब्जाधीश फायनान्सर होता. त्याने त्याच्याकडे असलेल्या पैशांच्या जोरावर जगातील श्रीमंतांसोबत संबंध प्रस्थापित केले. एपस्टिनच्या या सर्कलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा नाव आहे. इतका पैसा होता, त्याशिवाय एपस्टिनने सेक्स क्राइमचे सुद्धा गुन्हे केले. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप झाले.
सेक्स तस्करीचे गंभीर आरोप
1953 साली न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या एपस्टिनने कॉलेजमध्ये डिग्री घेतल्याशिवाय बँकिंग आणि वित्त क्षेत्रात आपली कंपनी स्थापन केली. एपस्टीनवर अल्पवयीन मुलींच लैंगिक शोषण आणि सेक्स तस्करीचे गंभीर आरोप झाले. 2005 मध्ये एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात तपास सुरु झाला. यात 36 अल्पवयीन मुलींची ओळख पटली. 2008 साली त्याला वेश्यावृत्तीच्या संबंधित दोन आरोपात दोषी ठरवण्यात आलं. 13 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. जेफरी एपस्टिनची हाय-प्रोफाइल व्यक्ती उदहारणार्थ बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि प्रिंस एंड्रयू सारख्या व्यक्तींबरोबर मैत्री होती.
तुरुंगात रहस्यमयी मृत्यू
2019 साली एपस्टिनला पुन्हा मानव तस्करी आणि लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पण सुनावणीआधीच तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. अधिकृतपणे त्याला आत्महत्या सांगण्यात आलं.
बेटावर मनोरंजनाची सर्व व्यवस्था
जेफरी एपस्टिनकडे प्रचंड पैसा होता. त्याने अमेरिकेत एक प्रायवेट बेट विकत घेतलं होतं. त्याचं स्वत:च विमान होतं. त्या विमानातून अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्ती त्या बेटावर जायचे. पार्ट्या चालायच्या तिथे. हाय-प्रोफाईल व्यक्तींच्या मनोरंजनाची सर्व व्यवस्था इथे जेफरी एपस्टिनने केलेली असायची.
‘लोलिता एक्सप्रेस’ म्हटलं जायचं
जेफरी एपस्टिनच्या या खासगी विमानाला पार्टी सर्कलमध्ये ‘लोलिता एक्सप्रेस’ म्हटलं जायचं. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार या लोलिता एक्सप्रेसमधून माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवास केलाय.
ट्रम्प कितीवेळा ‘लोलिता एक्सप्रेस’मधून गेले?
इकोनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 ते 1997 दरम्यान या खासगी विमानातून कमीत कमी 7 वेळा प्रवास केलाय. ट्रम्प त्यावेळी एक बिजनेस टायकून आणि रियल एस्टेट डेवलपर होते. एपस्टीनचे सहकारी म्हणून लोक त्यांना ओळखायचे. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. ट्रम्प यांनी 2024 साली ट्रुथ सोशल पोस्टमध्ये दावा केलेला की, ‘मी कधी एपस्टीनच्या विमानाने त्याच्या मूर्ख बेटावर गेलो नाही’
चुकीच काम केलय असा अर्थ होत नाही
माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे सुद्धा या जेटवरील अनेक फोटो समोर आलेत. एखाद्या प्रकरणाशी संबंधित फाइल्समध्ये कुठल्या व्यक्तीच नाव आहे, म्हणून त्या व्यक्तीने काही चुकीच काम केलय असा अर्थ होत नाही.
विक्टोरिया सीक्रेट एंजेल्सच्या पार्टीमध्ये एकत्र
एपस्टीनला 2019 साली अटक झाल्यानंतर ट्रम्प त्याच्यापासून दूर झाले. 1980 च्या दशकापासून 2000 च्या सुरुवातीपर्यंत दोघे चांगले मित्र होते. अलीकडेच एक फोटो समोर आलेले. त्यात मार-ए-लागोच्या पार्टीत दोघे परस्परांशी बोलताना दिसलेले. विक्टोरिया सीक्रेट एंजेल्सच्या पार्टीमध्येही त्यांना एकत्र पाहण्यात आलं होतं.
सुंदर महिला आवडतात
2002 साली दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीनच कौतुक केलं होतं. त्याला शानदार व्यक्ती म्हटलं होतं. त्यावेळी ट्रम्प एपस्टिनबद्दल बोललेले की, “त्याच्यासोबत राहण खूपच मजेदार आहे. असही म्हटलं जातं की, त्यालाही तितक्याच सुंदर महिला आवडतात, जितक्या मला. त्यात अनेक युवा आहेत. जेफरीला आपलं सोशल लाइफ आवडतं”
ट्रम्प यांच्यासोबत मैत्री तुटल्यानंतर मस्क यांनी याच गोष्टींचा उल्लेख केलाय. हे जे कायदेशीर रेकॉर्ड गोपनीय आहेत, त्यांना एपस्टीन फाइल्स म्हटलं जातं.