AMCA Project : टायमिंग बघून अमेरिकेच्या GE कंपनीने डाव साधला, भारताचा महत्वाकांक्षी स्टेल्थ विमान निर्मिती प्रकल्प आणला अडचणीत
AMCA Project : अमेरिकेच्या GE कंपनीने गरज ओळखून डाव साधला आहे. त्यामुळे रडारवर न दिसणारं पाचव्या पिढीचं स्टेल्थ विमान बनवण्याचं भारताच स्वप्न अडचणीत आलं आहे. भारताचा हा अत्यंत महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.

भारताच्या महत्वाकांक्षी अत्याधुनिक मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रोजेक्टमध्ये नवीन अडचण आली आहे. अमेरिकेच्या GE एयरोस्पेस कंपनीचं F414 इंजिन AMCA Mk-1 आणि तेजस Mk-2 साठी निवडण्यात आलं होतं. हे इंजिन आता अजून महाग झालं आहे. आधी एका इंजिनची किंमत 70 ते 80 कोटीच्या घरात होती. तीच किंमत आता 200 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. इंजिनच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने DRDO आणि एरोनॉटिकल डेवलपमेंट एजन्सीची (ADA) चिंता वाढली आहे. टेक्निकल चर्चेत प्रगती झाली होती. किंमत, टेक्नोलॉजी ट्रान्सफर, प्रोडक्शन आणि गुंतवणूक या व्यावसायिक मुद्यांवर मतभेद आहेत. GE ने भारतात F414 इंजिनची असेंबली आणि उत्पादन कारखाना सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी जवळपास 800 मिलियन डॉलर (जवळपास 6000 कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूकीची गरज आहे.
F414 इंजिनची मूळ निवड तेजस Mk-2 साठी करण्यात आलेली. पहिल्या दोन ते चार स्क्वॉड्रन्समध्ये हे इंजिन लागणार आहे. नंतर शक्तीशाली स्वदेशी इंजिन बनवण्यात येईल. AMCA ट्विन इंजिनचं स्टेल्थ फायटर जेट आहे. यात 5 प्रोटोटाइप्साठी 15 इंजिनची आवश्यकता आहे. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रोटोटाइप विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मंजूर केले आहेत. उड्डाण चाचणीत 1800 सॉर्टीज आणि सात वर्ष लागणार आहेत. इंजिन समस्येमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रभावित होऊ शकतो.
इंजिन बदलणं इतकं सोपं नाही
किंमतीमध्ये अचानक झालेली वाढ आणि गुंतवणूकीच्या मोठ्या आकड्यामुळे AMCA प्रोजेक्ट समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संस्थांनी आता पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. फ्रान्सची सॅफ्रान आणि ब्रिटनची रोल्स-रॉइस या कंपन्यांनी सुद्धा भारतासोबत मिळून इंजिन विकासात स्वारस्य दाखवलं होतं. या दोन्ही कंपन्या टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि औद्योगिक सहकार्याचा चांगला प्रस्ताव देऊ शकतात. इंजिन बदलणं इतकं सोपं नाही. कारण यामुळे उड्डाण नियंत्रण, सर्टिफिकेशन, परीक्षण आणि परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. एयरफ्रेम डिजाइन जवळपास फायनल झाली आहे.
आधीच इंजिन पुरवठ्याला विलंब
तेजस Mk-1A प्रोजेक्टमध्ये आधीच इंजिन पुरवठ्याला विलंब झाला आहे. आता AMCA मध्ये सुद्धा हीच समस्या येऊ शकते. पाचव्या पिढीची स्टेल्थ टेक्नोलॉजी मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे.