
टॅरिफ धोरणामुळे सतत चर्चेत राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळे शेअर बाजारातील विक्रमी वाढ झाली आहे आणि देशाच्या तिजोरीत “शेकडो अब्ज डॉलर्स” येत आहेत. मात्र त्याच वेळी, त्यांना न्यायालयाच्या शुल्कावरील निर्णयाची भीती सतावते आहे. . कदाचित याच भीतीमुळे त्यांनी इशारा दिला होता की त्यांच्याविरुद्ध कोणताही न्यायालयाचा निर्णय अमेरिकेला “1929 सारख्या महामंदीत” ढकलू शकतो.
सोशल मीडियावरील एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, या शुल्कांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर “मोठा सकारात्मक परिणाम” होत आहे आणि “जवळजवळ दररोज नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होत आहेत.” जर यावेळी “कट्टरपंथी डाव्या न्यायालयाने” (Radical Left Court)त्यांच्या प्रशासनाविरुद्ध निकाल दिला तर परिणामी होणारे आर्थिक नुकसान “भरपाई करणे अशक्य” होईल असा इशारा त्यांनी दिला. “पुन्हा एकदा 1929 सारखीच परिस्थिती उद्भवेल, एक महामंदी!” आणि असा निर्णय घेतल्याने “अमेरिकेची संपत्ती, शक्ती आणि ताकद कमी होईल” आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले अनेक फायदे रद्द होतील, असंही त्यांनी नमूद केलं.
मग आपण महानतेची संधी गमावू : ट्रम्प
जर न्यायालयांना त्यांची धोरणे थांबवायची असतील तर त्यांनी या प्रकरणात खूप आधीच निकाल द्यायला हवा होता, असा आग्रह अध्यक्ष ट्रम्प यांनी धरला. जर निकाल त्यांच्या विरोधात गेला तर अमेरिका आता “महानतेची संधी” (Chance at Greatness) गमावेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. “आपला देश यश आणि महानतेला पात्र आहे, ही अराजकता, अपयश आणि अपमानाला नाही. देव अमेरिकेला आशीर्वाद देवो!” असं त्यांनी नमूद केलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डझनभराहून अधिक देशांमधून अमेरिकेतील आयातीवरील नवीन शुल्क गुरुवारी, दोन दिवस आधीच लागू केले.
ट्रम्प यांनी अलिकडेच अनपेक्षितपणे भारतावर 50 % टॅरिफ लादलं. त्यांचं असं म्हणणं आहे की, रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारताला काही आयातीवर अतिरिक्त 25 % कर भरावा लागेल, ज्यामुळे एकूण कर दर 50 % होईल. मात्र, या निर्णयामुळे अमेरिकेला होणाऱ्या सुमारे 55% निर्यातीवर परिणाम होईल आणि दीर्घकालीन व्यापार संबंध धोक्यात येतील असं अनेक निर्यातदाराचं म्हणणं आहे.
1929 साली काय झालं होतं ?
1929 चा महामंदी, ज्याला “महामंदी” असेही म्हणतात, 96 वर्षांपूर्वी मध्ये सुरू झाली आणि पुढील दशकभर टिकली. महामंदीच्या या काळात जागतिक स्तरावर तीव्र आर्थिक मंदी आली. महामंदीच्या या काळात, जागतिक स्तरावर तीव्र आर्थिक मंदी आली. या मंदीमुळे औद्योगिक उत्पादन आणि किमतींमध्ये मोठी घट झाली, प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली आणि बँकिंग क्षेत्रात संकट निर्माण झाले. या महामंदीचा अमेरिकेवर लक्षणीय परिणाम झाला.
1929 साली अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, ज्याला “ब्लॅक ट्युसडे” म्हणून ओळखले जाते, आणि 10 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या आर्थिक संकटाची सुरुवात झाली.
मध्यरात्रीपासून नवीन दर लागू
असोसिएटेड प्रेसने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे प्रमुख एस.सी. राल्हन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “ही अचानक वाढलेली किंमत सहन करणे शक्य नाही. मार्जिन आधीच खूप कमी आहेत.” मध्यरात्रीनंतर नवीन टॅरिफ दर लागू झाले, जे 60 हून अधिक देश आणि युरोपियन युनियनमधील उत्पादनांवर लागू होतील. युरोपियन युनियन व्यतिरिक्त, जपान आणि दक्षिण कोरियामधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर आता 15% टॅरिफ लादण्यात आला आहे. तर तैवान, व्हिएतनाम आणि बांगलादेशमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 20% टॅरिफ लादण्यात येईल.
ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाअंतर्गत संगणक चिप्सवर 100 टक्के टॅरिफ आणि औषधांवर मोठा कर लादला आहे. अमेरिका आता “शेकडो अब्ज डॉलर्सचे टॅरिफ घेत आहे” असे सांगत यामध्ये “अभूतपूर्व” वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.