
बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसेचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी दीप चंद्र दास या हिंदू धर्मातील तरुणाची जमावाने हत्या केली होती, त्यानंतर आता अमृत मंडल उर्फ सम्राट नावाच्या तरुणाची देखील जमावाने हल्ला करून हत्या केली आहे. अमृत मंडल नावाच्या या 29 वर्षांच्या तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बांगलादेशमधील राजबाडी जिल्ह्यात घडली आहे. पांग्शा मॉडल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील स्थानिकांनी अमृत मंडल याच्यावर जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर त्याच्यावर जमावाने हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. ही गेल्या काही दिवसांमधील हिंदू तरुणाच्या हत्येची दुसरी घटना आहे.
ज्या अमृत मंडलची हत्या झाली त्याचं नाव पोलीस रेकॉर्डमध्ये एका स्थानिक संघटनेचा नेता म्हणून आहे. या संघटनेचं नाव सम्राट वाहिनी असं आहे, दरम्यान बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत. चटगावमध्ये राउजान परिसरात मंगळवारी एका हिंदू व्यक्तीच्या घराला आग लावण्यात आली होती, ही पहिलीच घटना नाहीये, तर गेल्या पाच दिवसांमध्ये या परिसरातील सात हिंदूंची घरं जाळण्यात आली आहेत, या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात देखील झाली होती हत्या
गेल्या आठवड्यात मयमनसिंह शहरात जमावाने एका 28 वर्षीय तरुणावर हल्ला केला होता. दीपू चंद्र दास असं या तरुणाचं नाव आहे, तो तेथील एका फॅक्टरीमध्ये कर्मचारी होता, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान दीपू चंद्र दास या तरुणाच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. ज्याचा जमावाच्या हत्येत मृत्यू झाला, त्या तरुणाच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार घेईल अशी घोषणा त्यावेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी केली होती, मात्र या घटनेला अवघे काही दिवस उलटले असतानाच आता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.