बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने खळबळ! भूकंप, महापूर आणि महायुद्ध, सप्टेंबरनंतर जगात हाहाकार?
Baba Vanga Predictions : बाबा वेंगांच्या अनुयायांचा दावा आहे की, या वर्षाचा उत्तरार्ध पृथ्वी आणि मानवजातीसाठी मोठ्या उलथापालथीचा ठरू शकतो. त्यांच्या काही भविष्यवाण्यांची माहिती जाणून घेऊयात.

भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे लोक बल्गेरियातील भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या भाकितांकडे नेहमीच कुतूहल आणि भीतीच्या नजरेने पाहत असतात. बाबा वेंगा या दोन्ही डोळ्यांनी पाहू शकत नव्हत्या, मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी पुढील अनेक दशकांबाबत काही भविष्यवाण्या केल्याचे सांगितले जाते. आता 2026 चा बराचसा कालावधी उलटून गेला आहे. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असल्याने इंटरनेटवर नव्या चर्चांना उधाण आले आहे. बाबा वेंगांच्या अनुयायांचा दावा आहे की, या वर्षाचा उत्तरार्ध पृथ्वी आणि मानवजातीसाठी मोठ्या उलथापालथीचा ठरू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मोठ्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता
बाबा वेंगांच्या कथित भविष्यवाण्यांचे विश्लेषण करणाऱ्यांच्या मते, उर्वरित 2026 मध्ये नैसर्गिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडू शकते. जगाच्या सुमारे 7 ते 8 टक्के भागात अचानक भीषण नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. यामध्ये मोठे विनाशकारी भूकंप, शांत असलेल्या ज्वालामुखींचा अचानक उद्रेक आणि अनपेक्षित महापुरांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेमुळे जगातील अनेक दाट लोकवस्तीच्या शहरांवर मोठा परिणाम होऊ शकतो. लाखो लोकांचे जीवन प्रभावित होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दोन खंडांमधील तणाव आणि तिसऱ्या महायुद्धाची भीती
नैसर्गिक आपत्तींसोबतच आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठ्या संकटाची शक्यता वर्तवली जात आहे. बाबा वेंगांच्या नावाने केल्या जाणाऱ्या दाव्यांनुसार, युरोप आणि आशियातील देशांमधील वाढता तणाव टोकाला जाऊ शकतो. सीमांवरील तणाव आणि कूटनीतिक प्रयत्नांना अपयश आल्यास जगाला नव्या महायुद्धाचा सामना करावा लागू शकतो, असा दावा केला जात आहे. यामुळे काही शक्तिशाली देशांमध्ये थेट लष्करी संघर्ष होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
आकाशातून अंतराळयान येणार?
2026 च्या अखेरीस परग्रहवासीयांशी संबंधित मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. बाबा वेंगांच्या अनुयायांच्या मते, नोव्हेंबर 2026 च्या आसपास आकाशात एक विशाल उडती तबकडी किंवा अंतराळयान दिसू शकते. हे यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि त्यानंतर मानवांचा पहिल्यांदाच एलियनशी संपर्क होईल, असा दावा केला जात आहे.
मशीन माणसांवर नियंत्रण मिळवणार?
तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेबाबतही बाबा वेंगांच्या नावाने अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. त्यानुसार, 2026 च्या अखेरीस AI इतकी शक्तिशाली होईल की, त्यावर मानवी नियंत्रण ठेवणे कठीण होईल. मशीन स्वतः निर्णय घेऊ लागतील आणि मानवांना त्यांच्या निर्णयांवर अवलंबून राहावे लागेल, असा दावा केला जात आहे. यासोबतच जगातील काही मोठ्या बँका दिवाळखोरीत निघाल्यामुळे मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, अशीही चर्चा आहे.
रशियाच्या सत्तेत मोठा बदल होणार?
रशियाच्या राजकीय परिस्थितीबाबतही बाबा वेंगांच्या कथित भविष्यवाण्यांच्या आधारे मोठे दावे केले जात आहेत. जवळपास दोन दशकांपासून रशियाची सत्ता सांभाळणारे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 2026 वर्ष संपण्यापूर्वी पद सोडू शकतात आणि त्यांच्या जागी एखादा नवा चेहरा सत्तेवर येऊ शकतो, अशी चर्चा आहे.
भविष्यवाण्यांबाबत किती सत्य?
बाबा वेंगा यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक भविष्यवाण्या व्हायरल होत असतात. मात्र, त्यांच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या अनेक भविष्यवाण्यांचे मूळ स्रोत, लिखित नोंदी किंवा विश्वसनीय पुरावे उपलब्ध नसतात. त्यामुळे वरील दावे हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. टीव्ही 9 मराठी या दाव्यांचे समर्थन करत नाही.
