
बांग्लादेश सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करत आहे. विद्यार्थी नेता शरीफ उस्लाम हादीच्या हत्येनंतर बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राजकीय अशांतता पहायला मिळाली. आता आणखी एक गंभीर संकट निर्माण झालय. ताज्या रिपोर्ट्नुसार पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला बांग्लादेशात कमीत कमी एक महिना कंडोम पुरवठा ठप्प होऊ शकतो. बांग्लादेशात जन्म दर वाढत असल्याचे संकेत मिळत असताना अशी स्थिती आली आहे. स्थानिक वर्तमानपत्र द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, निधीची कमतरता आणि स्टाफच्या कमतरतेमुळे बांग्लादेशात सध्या 38 दिवस पुरेल इतकाच कंडोमचा स्टॉक शिल्लक राहिला आहे. अधिकाऱ्यांनुसार, त्यानंतर कमीत कमी एक महिना कंडोम मिळणार नाहीत.
कंडोम संकट अशावेळी आलय, जेव्हा बांग्लादेशात 50 वर्षानंतर पहिल्यांदाच एकूण प्रजनन दरात (TFR) वाढ नोंदवली गेली आहे. मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्वे 2025 नुसार, देशाचा TFR वाढून 2.4 झाला आहे. मागच्यावर्षी जो 2.3 होता. अलीकडच्या काही वर्षांत अनेक जोडपी कुटुंब नियोजनापासून लांब होत आहेत. दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. गर्भनिरोधकाची कमतरतेमुळे हे प्रमाण आणखी वाढू शकतं.
सहावर्षात कंडोम पुरवठ्यात किती टक्के घसरण?
देशात कुटुंब नियोजन कार्यक्रमातंर्गत डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॅमिली प्लानिंग (DGFP) विभाग लोकांना मोफत गर्भनिरोधक साधनं उपलब्ध करुन देतो. यात कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, आययूडी, इंजेक्शन आणि इम्प्लांट यांचा समावेश आहे. पण आता हीच व्यवस्था गंभीर संकटात आहे. राष्ट्रीय गर्भनिरोधक सारांश रिपोर्टनुसार, मागच्या सहावर्षात कंडोम पुरवठ्यात 57 टक्के घसरण झाली आहे. फक्त कंडोमच नाही, तर अन्य गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता सुद्धा कमी होत गेलीय. आकड्यांनुसार, गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा 63% टक्क्याने घटला आहे. IUD ची उपलब्धता 64% टक्क्याने घसरली आहे. इंजेक्शन 41% टक्के कमी झालेत. इम्प्लांटचा पुरवठा 37% टक्क्याने घटला आहे.
अधिकाऱ्याने काय सांगितलं?
DGFP चे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय यूनिटचे संचालक अब्दुर रज्जाक यांनी सांगितलं की, “खरेदीशी संबंधित कायदेशीर वाद मिटला तर काही गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा लवकर सुरु होऊ शकतो” कंडोमची कमतरता राहणार हे त्यांनी स्पष्ट केलय. लोकांना कमीत कमीत एक महिना त्रास सहन करावा लागेल. फिल्ड लेव्हल कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा परिस्थिती आणखी बिघडलीय. कायदेशीर अडचणींमुळे भरती प्रक्रिया थांबली आहे. हेच कर्मचारी घरोघरी जाऊन गर्भनिरोधक साधनांच वाटप करतात.