गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार होता डच्चू? पण या दिग्गज खेळाडूच्या निर्णयामुळे प्रशिक्षकपद राहीलं!
गौतम गंभीरने प्रशिक्षकपद हाती घेतल्यापासून कसोटीत टीम इंडियाला उतरती कळा लागली आहे. टीम इंडियाने दोन कसोटी मालिका घरच्या मैदानावर गमावल्या. इतकंच काय दोन्ही कसोटीत क्लिन स्वीप मिळाला. त्यामुळे गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका झाली. पण बीसीसीआयने त्याची पाठराखण केली.

गौतम गंभीर प्रशिक्षक होण्यापूर्वीच बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहीला. त्यामुळे प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर त्याच्या कार्यकाळाची चर्चा होणार हे स्पष्ट होतं. गौतम गंभीर प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत बरेच चढउतार पाहायला मिळाले आहेत. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. मात्र रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. भारताचं कसोटी चॅम्पियन्शिप 2025 अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्नातही अडथळे आले आहेत. त्यामुळे गौतम गंभीर पद मुक्त करण्याची मागणी जोर धरत होती. यासाठी बीसीसीआयने विचारही केला होता. पण बीसीसीआयला काही कारणास्तव तसं करता आलं नसल्याची चर्चा आहे.
टीम इंडियाला नुकतंच दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 पराभवाची तोंड पाहावं लागलं. मागच्या एका वर्षात टीम इंडियाने दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर कसोटीत क्लीन स्वीप झेलला आहे. त्यामुळे टीम इंडिया टीकेची धनी ठरली. इतकंच काय तर गौतम गंभीर टीकाकारांच्या रडारवर आला होता. असं असताना बीसीसीआयने मात्र गौतम गंभीरची पाठराखण केली. तसेच त्याला पदावरून दूर करण्यास नकार दिला. पण पडद्यामागे काही गोष्टी घडल्या. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने त्याला पदावरून काढण्याचा प्रयत्न केला होता.
रिपोर्टनुसार, बोर्डाशी निगडीत एका व्यक्तीने अनौपचारिकपणे दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला कसोटी संघाची धुरा सांभाळण्याची विनंती केली होती. गंभीरपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणला संघाच्या प्रशिक्षपदाची ऑफर दिली होती. पण लक्ष्मण नकार दिला आणि सेंटर ऑफ एक्सीलेंससोबत काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. जर लक्ष्मणने बीसीसीआयने दिलेली ऑफर स्वीकारली असती तर त्याला कसोटी संघाचं प्रशिक्षकपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता होती. पण त्याच्या नकारामुळे इतर कोणी दावेदार नाही. त्यामुळे गंभीरचं पद सध्यातरी सुरक्षित आहे. रिपोर्टमधील दाव्यानुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीवर गंभीरचं प्रशिक्षकपदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जर सर्व काही चांगलं राहीलं तर वर्ल्डकप 2027 पर्यंत गंभीर कायम राहील.
