अखेर बांगलादेशाने शेख हसीना यांना दोषी ठरवले, कोर्टाने सुनावली सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बांगलादेशाची माजी पंतप्रधान शेख हसीना यांची पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर कोर्टाच्या अवमानना प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा बांगलादेश सोडल्यानंतर सुमारे एक वर्षांच्या काळाने देण्यात आली आहे.

अखेर बांगलादेशाने शेख हसीना यांना दोषी ठरवले, कोर्टाने सुनावली सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
| Updated on: Jul 02, 2025 | 4:27 PM

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरुन हटवल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले होते. त्यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर जवळपास एक वर्षांनी त्यांना एका प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाच्या अवमानना प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुजा मझुमदार यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने बुधवारी हा आदेश दिला आहे. खंडपीठाचे अन्य दोन सदस्य न्या. मोहम्मद शफीऊल आलम महमूद आणि न्या. मोहम्मद मोहितुल हक इनाम चौधरी आहेत. न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील अन्य एक आरोपी गोबिंदगंज, गॅबांधाचे शकील अकंद बुलबुल उर्फ मोहम्मद शकील आलम यांना देखील दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

अन्य प्रकरणातही होऊ शकते शिक्षा

बांगलादेशात शेख हसीना यांच्या अन्य अनेक प्रकरणात खटले चालवले जात आहेत. शेख हसीना यांच्यावर भ्रष्टाचारापासून हत्येचे अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. शेख हसीना यांच्या विरोधकांनी त्यांना भारतात आणून फासीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने जुलैमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान मानवते विरुद्ध गुन्ह्यांच्या एका प्रकरणात पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य तिघांविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी सुरु केली आहे.

शेख हसीना यांचा भारतात आश्रय

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख युनुस यांनी भारताने शेख हसीना यांना परत करण्याची मागणी केलेली आहे. भारताने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताचे बांगलादेशाशी चांगले नाते होते. मात्र बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनानंतर झालेल्या उठावानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर या देशाशी भारताचे संबंध बिघडलेले आहेत.