
इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अशातच आता अमेरिका आणि इस्रायल यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराणच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे की अमेरिका आणि इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून 30 जणांना अटक करण्यात आली आहे. इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशातील अनेक प्रांतांमध्ये तपास आणि कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 30 जणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. मंत्रालयाच्या मते, अटक करण्यात आलेल्यांमध्ये कथित हेर, देशांतर्गत काम करणारे एजंट आणि काही मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांचा समावेश आहे.
इराणच्या या दाव्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण इराणचा दावा खरा ठरला तर अमेरिका आणि इस्रायलसाठी हा मोठा धक्का असणार आहे. या हेरांकडून अमेरिका आणि इस्रायलबाबतची गुप्त माहितीही इराणला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांसाठी हा मोठा धोका असू शकतो. आता या हेरांच्या चौकशीनंतर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मृत्यूदंडाचीही शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे.
आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा FBI कडून वाँटेड असलेला एक इराणी नागरिक मोहम्मद मेहदी फरहादी रहीम याचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला आहे. रहीमचा मृत्यू हमादन या इराणमधील शहरात अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांदरम्यान झाला. फरहादीला 2020 पासून अमेरिकन अधिकारी शोधत होते. त्याच्यावर सायबर हल्ल्यांमध्ये सहभाग आणि अमेरिका सहित अनेक देशांच्या संस्थांच्या संगणक प्रणालींमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप होता.
युद्धामुळे इराणमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे डेन्मार्कने मोठा निर्णय घेतला आहे. डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी आज तेहरानमधील दुतावास बंद केले असल्याची माहिती दिली आहे. सध्याची सुरक्षा परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे, त्यामुळे दूतावास सुरु ठेवणे ठेवणे सुरक्षित नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
इराणमधील वाढत्या सुरक्षेच्या धोक्यामुळे नेदरलँड्सनेही आपल्या दूतावासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री टॉम बेरेन्डसन यांनी सांगितले की, इराणमध्ये काम करणाऱ्या आमच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना तात्पुरते अझरबैजानला पाठवले जाईल. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डच दूतावासाची कामे आता तात्पुरती बाकू येथून चालवली जाणार आहेत.