
1971 च्या युद्धात पाकिस्तानविरोधात भारताने बांगलादेशाला मोठी मदत केली. येथील बांगला मुस्लिमांवर पाकिस्तानी लष्कराने जघन्य हत्याकांड घडवले. बलात्कार केले. खुलेआत कत्तली केल्या. त्यावेळी भारत बंगाली मुस्लिमांसाठी धावून गेला. बांगलादेश स्वतंत्र झाला. पण याच बांगलादेशात अमेरिकेने तख्तापालट केला. त्यानंतर तिथे भारताविरुद्धी वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी पाकिस्तानचे मुल्ला-मौलवी मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय खतपाणी घालत आहेत. बांगलादेशात पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा मुक्त संचार सुरू आहे. बांगलादेशाला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर त्यासाठी मोठा चाल खेळत आहे. या सर्व घडामोडींना डोनाल्ड ट्रम्प यांची फूस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बांगलादेशातील प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी याविषयीचा गंभीर इशारा दिला आहे. भारताने वेळीच याविषयी ठोस भूमिका घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बांगलादेशात ISI सक्रीय
सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी ब्लिट्जमध्ये एक सखोल चिंतन करणारा लेख लिहिला आहे. त्यात बांगलादेशात पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय सक्रीय झाल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोहम्मद युनूस यांचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात आल्यापासून अनेक पाक लष्करी अधिकारी आणि आयएसआयचे एजंट ढाक्यात दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांगलादेशातील अस्थिरतेचा फायदा घेऊन एक कठपुतळी सरकार ढाक्यात आणण्याचा असीम मुनीर यांनी चंग बांधल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ढाक्यातून दहशतवाद पसरवण्याचे आणि दक्षिण आशिया अस्थिर करण्याचा पाकचा प्रयत्न असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
ट्रम्प यांची फूस, मुनीरची चाल
असीम मुनीर हा अमेरिकच्या दौऱ्यावर असताना त्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर बांगलादेशचे कार्ड टाकले. त्यानुसार, अमेरिका बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतात इंधन, सोने यांचा शोध घेईल. येथील खनिज संपत्तीवर अमेरिकेचे नियंत्रण राहिल. त्याबदल्यात अमेरिकेन ढाका हे अप्रत्यक्षरित्या इस्लामाबादच्या नियंत्रणात राहिल अशी तजवीज करावी. त्यासाठी मुकसंमती द्यावी असा प्रस्ताव मुनीरने दिल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. बांगलादेशी हे नमक हराम झाल्याची टीका बांगलादेशातील अनेक उदारमतवादी उघडपणे बोलत आहे. जमातच्या नावाखाली पाकिस्तानी मुल्ला-मौलवी ढाका आणि इतर भागात जावून भारतद्वेष पसरवत आहेत. बांगलादेश हा दक्षिण आणि पूर्व आशियात ड्रग्स पुरवठा करणारा, अमंली पदार्थ हब तयार करण्यासाठी पाकिस्तान लष्कराने कंबर कसल्याचा आरोप चौधरी यांनी केला. या माध्यमातून येथील बेकार तरुणांची माथी भडकावून त्यांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करण्यात येणार असल्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.