‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मर्यादा ओलांडल्या…’,कॅलिफोर्नियाकडून कोर्टात खटला दाखल

ट्रम्प त्यांचे राजकीय हितसंबंध पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करत आहेत. ते संघीय कायद्याचा गैरवापर करत आहे, असा आरोप कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल रॉब बोंटा यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मर्यादा ओलांडल्या...,कॅलिफोर्नियाकडून कोर्टात खटला दाखल
| Updated on: Jun 10, 2025 | 7:34 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवरही चर्चेत आहे. आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियानेच ट्रम्प प्रशासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या गव्हर्नरच्या मंजुरीशिवाय लॉस एंजेलिसमध्ये दोन हजार सैनिक तैनात करण्याच्या निर्णय ट्रम्प यांनी घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, असा दावा करत हा खटला दाखल केला आहे.

कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल रॉब बोंटा म्हणाले की, ट्रम्प यांनी घेतला निर्णय बेकायदेशीर आहे. अमेरिकेत आधीच तणावपूर्ण परिस्थिती आहे. ती आणखी बिकट होऊ शकते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या संमतीशिवाय सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियामध्ये कोणताही हल्ला झाला नाही किंवा बंडखोरी झाली नाही. परंतु ट्रम्प त्यांचे राजकीय हितसंबंध पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करत आहेत. ते संघीय कायद्याचा गैरवापर करत आहे. हा कायदा परकीय हल्ला किंवा अमेरिकन सरकारविरुद्ध मोठा बंड यासारख्या विशेष परिस्थितीत सैन्य पाठवण्याची परवानगी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना देतो. कॅलिफोर्निया सरकारने सांगितले की, सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही.

लॉस एंजेलिसमध्ये इमिग्रेशन छाप्यांविरुद्ध हिंसक निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी त्या ठिकाणी सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या निर्णयास विरोध करताना गव्हर्नर न्यूसम आणि इतर डेमोक्रॅट नेते म्हणतात की, राज्य सरकार या परिस्थिती स्वतः हाताळू शकते आणि संघीय सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

गर्व्हनरकडून ट्रम्प यांना पत्र

गवर्नर न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या निर्णयास विरोध करत त्यांच्या प्रशासनाला पत्रही लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, लॉसएंजेलिसमध्ये सैन्य पाठवण्याची गरज नाही. हे सैन्य त्वरित माघारी बोलवण्यात यावे. संघीय प्रणालीत राज्याच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे. जाणीवपूर्वक हे पाऊल उठवण्यात आल्याचा संशय यामुळे वाटत आहे.