Maharashtra Nagar Parishad election Result 2025 : ‘कर्माचे भोग आहेत ते..’ दारुण पराभवानंतर शिंदेंच्या आमदाराचे ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारे शब्द
Maharashtra Nagar Parishad election Result 2025 : "या सर्व निवडणुकीवरून आम्ही एक धडा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत युतीमध्ये लढायला पाहिजे. एकमेकांमध्ये खटके उडणार नाहीत याची देखील काळजी आम्ही घ्यायला पाहिजे" असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

“शिवसेनेच्या साडेतीन वर्षाच्या कामाचं हे फळ आहे. कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक ठिकाणी फिरत होते. जेवढ्या योजना आहेत, त्या सक्षमपणे राबवण्याचे काम आम्ही केलें. आम्ही कधीच एक नंबर वर दावा केला नव्हता. आम्ही महाराष्ट्रात दोन नंबर वर राहू, हे मी पहिल्यापासून सांगत होतो. स्ट्राइक रेट जर पाहिला तर सर्वात चांगला स्ट्राईक रेट आमचा आहे. पूर्ण महाविकास आघाडी मिळून जेवढ्या जागा आल्या नाहीत. त्यापेक्षा पुढे एकनाथ शिंदे साहेब राहिले आहेत” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. “आता गाव खेड्यापर्यंत विकास या माध्यमातून निश्चित होणार आणि याचा फायदा नक्कीच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला होईल” असं ते म्हणाले.
“मोठा भाऊ ठरणारच ना. त्यांच्या जागा जास्त होत्या. त्यामुळे त्यांची संख्या देखील जास्तच येणार आणि ते आम्ही नाकारलेलं नाही. अचानक एवढ्या सगळ्या निवडणुका लढवणं आणि मॅनेजमेंट करणं हे आणि यातून कदाचित काही आमच्याकडून राहिले असेल. ऐन वेळेला तुम्ही बघितले असेल. या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात होते. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झालेला आहे. प्लॅनिंग करून जर ही निवडणूक लढवली असती तर निश्चित अजून जास्त यश आमच्या पदरात पडले असते” असं संजय शिरसाट म्हणाले.
यामुळे कार्यकर्ता खचलेला होता
“कर्माचे भोग आहेत ते, उबाठाच्या कुठल्याच व्यक्तीने महाराष्ट्रात कधी सभा देखील घेतल्या नाहीत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताकदीवर लढावे असे त्यांचे आव्हान होते, यामुळे कार्यकर्ता खचलेला होता. त्याला ना कुठली मदत मिळाली. ना त्याच्या प्रचारात कोणी सहभागी झाले. आता एक बातमी समोर आली की एकाने उबाठाकडून निवडणूक लढवली आणि दुसरीकडे गेला. त्यामुळेच ठाकरे गटात सर्व कंटाळलेले आहेत आणि ठाकरे गट पूर्णपणे खाली होणार आहे” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
तुमच्या पराभवाचे रूपांतर विजयात होणार नाही
“लोकशाहीमध्ये जर विजय झाला ना तर तो पैशामुळे झाला, ईव्हीएम मुळे झाला, असे आरोप होतात. मात्र विजय हा विजय असतो. असे कारण दाखवून तुमच्या पराभवाचे रूपांतर विजयात होणार नाही. म्हणून जनतेने तुम्हाला न्याय दिलेला आहे, जो कौल दिला आहे तो तुम्हाला मान्यच करावा लागेल” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
त्या सीट काँग्रेसकडे गेलेल्या आहेत
“जिल्ह्यात आम्ही मोठे भाऊ ठरलो आणि ज्या ठिकाणी आम्हाला खात्री नव्हती, त्या सीट काँग्रेसकडे गेलेल्या आहेत, या निकालावर आम्ही समाधानी आहोत” असं संजय शिरसाट निकालावर म्हणाले.
