Donald Trump: चार्ली कर्क यांची हत्या करणाऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, ‘मृत्युदंडाची शिक्षा देणार…’

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि रूढीवादी कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Donald Trump: चार्ली कर्क यांची हत्या करणाऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, मृत्युदंडाची शिक्षा देणार...
trump and charlie kirk
| Updated on: Sep 12, 2025 | 7:25 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि रूढीवादी कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. युटा विद्यापीठात व्याख्यानादरम्यान 31 वर्षीय कर्क यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. संशयित आरोपीला पकडल्यानंतर त्याला आता मृत्यूदंडाची शिक्षा देणार असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘मला वाटते की आम्हाला तो सापडला आहे. या संशयित आरोपीला ओळखणाऱ्या एका व्यक्तीने अटकेसाठी मदत केली आहे. एक मंत्रीही आरोपीला पकडण्याच्या मोहिमेत सामील होता. सध्या संशयित पोलिस मुख्यालयात आहे. मला आशा आहे की त्याला मृत्युदंडाची शिक्षा मिळेल. हा संशयित आरोपी एखाद्या मोठ्या नेटवर्कमध्ये सामील होता की नाही ते अद्याप समजू शकलेले नाही असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकन कमबॅक टूर दरम्यान हल्ला

चार्ली कर्क यांच्या हत्येची घटना युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये घडली. चार्ली कर्क हे या ठिकाणी द अमेरिकन कमबॅक टूर कार्यक्रमासाठी आले होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चार्ली माइक हातात धरून बोलत आहे. मात्र त्याचवेळी अचानक त्याच्या मानेजवळ एक गोळी लागते, त्यानंतर रक्त वाहू लागले आणि तो जमिनीवर पडतो आणि त्याचा मृत्यू होतो.

जंगलात सापडले हत्यार

चार्ली कर्कच्या हत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. एफबीआयने कर्कवर गोळीबार केलेली रायफल जप्त केली आहे. ही रायफल घटनास्थळाजवळील जंगलात फेकण्यात आली होती. एफबीआय अधिकारी रॉबर्ट बोहल्स यांनी सांगितले की, ही एक उच्च-शक्तीची बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल आहे. अशा रायफल्स अचूकपणे लक्ष्य साधण्यासाठी ओळखल्या जातात.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, निवृत्त एफबीआय एजंट ब्रॅड गॅरेट यांनी म्हटले की, या हत्येनंतर मिळालेले पुरावे असा इशारा करत आहेत की, ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. पळून जाताना तो लवकर हत्यारासह दिसू नये म्हणून त्याने रायफल फेकली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही एका इमारतीच्या छतावरून खाली उतरताना आणि नंतर रस्ता ओलांडून जंगलाकडे जाताना दिसत होता त्यामुळे या हत्येसाठी पूर्वतयारी करण्यात आली होती असा संशय आहे.