
गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांनी आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. अशातच आता चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चीनने आपल्या लष्करी कारवायांद्वारे या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. चीनने तैवानच्या आसपास लष्करी अभ्यास सुरू केला आहे. चीनकडून बेटाचे प्रमुख भाग ताब्यात घेऊन नाकेबंदी करण्याचा सराव केला जात आहे. सैन्य, नौदल, हवाई दल आणि रॉकेट फोर्स हा सराव करत आहे. या सरावात लाईव्ह फायरिंग देखील केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेने तैवानला शस्त्रे विकण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर काहीच दिवसांनी चीनने या सरावाला सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेवर टीका करताना चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. गेल्या काही काळापासून तैवान आपल्या ताफ्यात अनेक शस्त्रे जोडत आहे, त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. अशातच आता चीनकडून सरावाला सुरूवात झाल्याने आगामी काळात आता युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र, ग्लोबल टाईम्सने दिलेल्या महितीनुसार या सरावात चायना कोस्ट गार्ड (CCG) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. CCG ने तैवान सामुद्रधुनीत गस्त आणि नियंत्रण असे टायटल असलेले एक पोस्टस छापले आहे. यात सीसीजी जहाजांचा एक गट तैवान बेटाकडे तीन दिशांनी येत असल्याचे दिसत आहे. तैवान बेटाच्या पूर्वेकडील भागात अनेक सीसीजी जहाजे नाकेबंदी करत असल्याचे पहायला मिळत आहे.
तैवान न्यूजने दिलेल्या माहितीनुसार तैवानने आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. तज्ञांनी असे म्हटले आहे की, हा सराव आक्रमण तयारीचा एक भाग आहे. मात्र सध्या चीन शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयाने चीनच्या या लष्करी सरावावर टीका केली आहे. हा सराव आंतरराष्ट्रीय नियमांना आव्हान असल्याचे म्हटले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अशीही माहिती दिली की, आम्हाला तैवानभोवती चिनी विमाने आणि जहाजे आढळली आहेत. त्यामुळे आम्ही सैन्य आणि क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, तैवानचे रक्षण करण्यासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.