असा एक देश जिथे पैसे भरून लोक जेलमध्ये जातात, 28 दिवस जेलमध्ये राहून येतात बाहेर, कारण ऐकून बसेल धक्का
जगातील असा एक देश जिथे स्वत:हून लोक जेलमध्ये जाण्यासाठी देतात पैसे, 28 दिवस जेलमध्ये राहतात. नेमकं कारण काय?

China Fat Jail: चीनमध्ये सध्या वजन कमी करण्यासाठी एक वेगळीच संकल्पना चर्चेत आली आहे. ‘फॅट जेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी गुन्हेगार नाही तर लठ्ठपणाने त्रस्त लोक स्वतःहून पैसे भरून ‘कैद’ होण्यासाठी येतात. ऐकायला विचित्र वाटणारी ही कल्पना प्रत्यक्षात एक विशेष प्रकारचा वेट लॉस कॅम्प असून, अल्पावधीत वजन कमी करण्यासाठी येथे अत्यंत कडक शिस्त आणि नियंत्रित जीवनशैली पाळावी लागते.
हा ‘फॅट जेल’ प्रत्यक्षात तुरुंग नसला तरी त्याची रचना आणि नियम पाहता तो एखाद्या जेलसारखाच वाटतो. उंच भिंती, मोठे गेट, सतत देखरेख आणि बाहेर जाण्यावर निर्बंध. या सगळ्यामुळे येथे राहणाऱ्यांना कैदेत असल्यासारखेच वाटते. मात्र, फरक इतकाच की येथे लोक स्वतःच्या इच्छेने आणि पैसे देऊन येतात.
28 दिवसांचा कडक कार्यक्रम
या कॅम्पचा कार्यक्रम साधारण 28 दिवसांचा असतो. या काळात सहभागी व्यक्तींना बाहेर जाण्याची परवानगी नसते. रोज सकाळपासून त्यांचा दिवस कठोर व्यायामाने सुरू होतो. एरोबिक्स, हाय-इंटेन्सिटी ट्रेनिंग आणि इतर फिटनेस अॅक्टिव्हिटीज अशा विविध प्रकारच्या व्यायामांचा समावेश असतो. दररोज सुमारे चार तास कष्टदायक शारीरिक प्रशिक्षण दिले जाते.
या ‘फॅट जेल’मध्ये आहारावर पूर्ण नियंत्रण ठेवले जाते. दिवसातून फक्त तीन वेळा ठराविक प्रमाणातच अन्न दिले जाते. नाश्ता हलका असतो तर दुपारच्या जेवणात ब्रेज्ड डक, तळलेल्या भाज्या आणि कच्च्या गाजरांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. बाहेरून कोणतेही खाद्यपदार्थ आणण्यास सक्त मनाई असते. कॅम्पमध्ये प्रवेश करतानाच सर्व प्रतिबंधित खाद्यपदार्थ जप्त केले जातात.
‘जेल’सारखा अनुभव
इंस्टाग्रामवर @eggeats नावाने व्हिडिओ बनवणाऱ्या टीएल हुआंग यांनी या कॅम्पचा अनुभव सांगताना तो पूर्णपणे जेलसारखा असल्याचे नमूद केले. त्यांनी 28 दिवस कॅम्पच्या बाहेर पाऊल ठेवले नाही आणि दररोज वजन तपासणी करावी लागत होती. या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांना सुमारे अंदाजे 89 हजार रुपये खर्च करावे लागले.
काही लोकांच्या मते हा कॅम्प जलद वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. मात्र, अनेक जण याला अतिशय कठोर आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक मानतात. त्यामुळे या ‘फॅट जेल’ची संकल्पना जितकी लोकप्रिय होत आहे तितकीच ती वादग्रस्तही ठरत आहे.