Nepal Flood: जिथून महाप्रलय सुरू झाला तिथे खरंच चीन पोहोचला का, व्हिडीओमागचं सत्य काय?
Nepal Flood: हिमनदीचा मोठा भाग तुटून नेपाळमध्ये विध्वंसक पूर आला आहे. चीनचं हेलिकॉप्टर त्याठिकाणी पोहोचून जिथून हा महाप्रलय सुरू झाला, तिथला व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. ग्लेशियरचा भाग तुटून कसा पुढे पाण्याचा मोठा प्रवाह बनला, हे त्यात पहायला मिळतंय.

तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी (26 ऑगस्ट 2026) मध्य नेपाळमध्ये हाहाकार उडाला. नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या पाण्याच्या आणि मलब्याच्या प्रचंड लोंढ्याने रस्ते, पूल, घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. घटना नेपाळ-चीन सीमेच्या अतिशय दुर्गम आणि पर्वतीय भागात घडल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचणं अत्यंत कठीण ठरत आहे. आता चीनचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पोहोचलं, जिथे हिमनदीचा (ग्लेशियर) मोठा भाग तुटला होता, असा दावा सोशल मीडियावरील एका व्हिडीओत करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून जिथून महाप्रलय सुरू झाला, तिथे चीन पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या व्हिडीओमागचं सत्य वेगळंच आहे.
व्हिडीओत काय दाखवलंय?
ग्लेशियरमधील बर्फाचा बांध तुटल्यानंतर त्यामागे साचलेलं पाणी वेगाने बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बर्फाच्या धरणाला मोठं भगदाड पडलेलं असून, त्यातून पाण्याचा प्रचंड प्रवाह खालीच्या दिशेने वाहताना दिसतो. पाण्याच्या या वेगवान प्रवाहामुळे ग्लेशियरच्या बर्फामध्ये खोल दरीसारखा मार्ग तयार झाला आहे. पाण्याने बर्फाला अक्षरशः पोखरून काढलं असून, पुढे त्यातून एक प्रकारचा कॅनियन आणि बर्फाच्या थरातून ‘स्कायलाइट’सारखा मार्ग तयार झालेला दिसतो. विशेष म्हणजे, या बर्फाच्या मार्गातून वाहणारं पाणी काही अंतरानंतर पुन्हा ग्लेशियरच्या बर्फाखाली गायब होतं. चीनचं हेलिकॉप्टर त्याठिकाणी पोहोचलं आणि तिथून व्हिडीओ शूट केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ तिथला नाही.
GLOF कधी तयार होतो?
GLOF तेव्हा होऊ शकतो, जेव्हा हिमनदीने अडवून ठेवलेल्या तलावाचा नैसर्गिक बांध अचानक फुटतो. पाण्याचा वाढलेला दबाव आणि हिमनदीतील भेगांमुळे पाण्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार होतो. त्यानंतर तलावात साचलेलं मोठ्या प्रमाणातील पाणी आणि मलबा पर्वतांवरून अत्यंत वेगाने खाली वाहू लागतो. त्यामुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणणारा महापूर येऊ शकतो. सॅटेलाइट प्रतिमांच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, बर्फ आणि दगडांचा मोठा भाग नदीचा प्रवाह अडवून तात्पुरता जलसाठा तयार झाला असावा आणि तो अचानक फुटल्याने महापूर आला असण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडीओ-
चीन का हेलीकॉप्टर उस जगह पहुंचा जहां ग्लेशियर टूटा था और उससे निकले पानी ने नेपाल में भारी तबाही मचाई थी। इस घटना को GLOF कहते हैं।
ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (#GLOF) तब आ सकता है, जब ग्लेशियर द्वारा रोकी गई झील का बांध अचानक टूट जाए। 🌊🧊
पानी के दबाव और ग्लेशियर में बनी… pic.twitter.com/TPSyOsK4Zc
— Ashish rai (@journorai) August 27, 2026
GLOF म्हणजे नेमकं काय?
GLOF म्हणजे Glacial Lake Outburst Flood, म्हणजेच हिमनदीमुळे तयार झालेल्या तलावाचा अचानक बांध फुटून येणारा महापूर. हिमालयासारख्या पर्वतीय भागात हिमनद्या वितळल्यामुळे त्यांच्याजवळ मोठे तलाव तयार होऊ शकतात. या तलावांना बर्फ, माती किंवा दगडांचा नैसर्गिक बांध अडवून ठेवतो. या नैसर्गिक बांधावर पाण्याचा दबाव वाढला किंवा हिमनदीचा काही भाग अचानक कोसळून तलावात मोठ्या प्रमाणात बर्फ-दगड पडले, तर बांध फुटू शकतो. त्यानंतर तलावातील प्रचंड पाणी अत्यंत वेगाने खालील दऱ्यांमध्ये वाहतं. या पाण्यासोबत माती, दगड, बर्फ आणि इतर मलबा वाहून गेल्याने पूर अधिक विध्वंसक बनतो.
नेपाळमधील अधिकाऱ्यांनी अद्याप GLOFच झाला होता, असा अंतिम निष्कर्ष दिलेला नाही. प्राथमिक तपासात बर्फाचा मोठा भाग आणि भूस्खलनामुळे लेंडे खोला नदीचा प्रवाह अडला असावा. त्यानंतर तयार झालेला तात्पुरता जलसाठा फुटल्याने पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मलबा खाली आला असण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञ मात्र ग्लेशियल लेक आऊटबर्स्टची शक्यताही व्यक्त करत आहेत