चीनच्या शोधाने जग हैराण, जमिनीच्याखाली अंधारात रहस्यमयी जीवन

पारंपारिक विज्ञानाचा सीमांना आव्हान देणाऱ्या या नव्या संशोधनाने वैज्ञानिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत पृथ्वीच्या आत खोल जीवन अशक्य असल्याचे मानले जात होते. परंतू नव्या संशोधनाने या धारणेला तडा गेला आहे.

चीनच्या शोधाने जग हैराण, जमिनीच्याखाली अंधारात रहस्यमयी जीवन
| Updated on: Aug 05, 2025 | 11:18 PM

संशोधकांनी आतापर्यंत मंगळ ग्रह आणि अन्य ग्रहांवर जीवनाच्या अस्तित्वाबद्दल अनेक दावे केले आहेत. एलियन्सच्या अस्तित्वा संदर्भातही अनेक अंदाज लावले जात आहेत. वैज्ञानिक या बाबत सहमत आहेत की पृथ्वीच्या दूर अंतराळात निश्चित रुपाने जीवन अस्तित्वात आहे किंवा त्याची शक्यता आहे. जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या दिशेने काम करत असताना चीनने मात्र अद्भूत संशोधन केले असून ते आधीच्या अंदाजांना कलाटणी देणारे आहे.

चीनी संशोधकांनी कॅनडाच्या संशोधनकर्त्यांची मदतीन पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोल अंधारात जीवनाचा पुरावा शोधून काढला आहे. हे स्थान असे आहे जेथे सुर्याचा प्रकाश कधीच पोहचत नाही. संशोधकांनी दावा केला आहे की पृथ्वीच्या खोल आत असणारे जीवन भूकंपातून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करतात जे आपल्याकडे नेहमीच येत असतात.

एका विशाल आणि सक्रीय जैवमंडळाचा शोध

वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या अंतर्गत भागात एका विशाल आणि सक्रीय जैवमंडळाचा शोध लावला आहे. अभ्यासात पृथ्वीच्या आत खोल प्रोकॅरियोट्सची एवढी मोठी संख्या आहे की पृथ्वीवर असलेल्या एकूण जैविक संरचनेच्या ९५ टक्के असू शकते. प्रोकॅरियोट्स म्हणजे एक पेशीय जीव असतात. ज्यात पडद्याशी जोडलेले अवयव (organelles) आढळत नाहीत. हा शोध पृथ्वीच्या जीवनासंबंधी आपल्या जाणीवांना संपूर्णपणे बदलू शकतो.

या प्रकारे जीवांना ऊर्जा मिळते..

चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसच्या ग्वांगझू इन्स्टिट्यूट ऑफ जिओकेमिस्ट्री (GIG) चे प्रोफेसर झू जियानक्सी, हे होंगपिंग आणि कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठाचे प्रोफेसर कर्ट कोनहॉसर यांनी एका संशोधनाद्वारे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हा अभ्यास ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनात असे आढळून आले की पृथ्वीवरील भूकंपीय क्रियाकलाप काही जीवांसाठी उर्जेचा स्रोत म्हणून काम करतात, जे त्यांचे जीवनचक्र चालवतात.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीच्या आत खोलवर, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, खडक आणि पाण्यामधील रासायनिक प्रक्रियांमुळे ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा एक प्रकारची नैसर्गिक बॅटरी म्हणून काम करते, ज्यामुळे इलेक्ट्रॉनचा प्रवाह शक्य होतो. असे मानले जाते की जीवनाच्या सुरुवातीला या प्रक्रियेने महत्त्वाची भूमिका बजावली असावी.

संशोधकांनी प्रयोगशाळेत पृथ्वीच्या सर्वात सामान्य सिलिकेट खनिज, क्वार्ट्ज यांचा अभ्यास केला, त्यांना आढळले की जेव्हा खडक तुटतात तेव्हा ते पृष्ठभागाच्या पाण्याच्या संपर्कात येतात, त्यातून रासायनिक प्रतिक्रीया होते. या प्रतिक्रीयेत फ्रॅक्चर ( फटी ) पाण्याच्या अणूंचे भंजन करतात ज्यामुळे हायड्रोजन गॅस आणि प्रतिक्रीयाशील ऑक्सिजन प्रजाती उत्पन्न होतात.

जीवनास अनुकूल वातावरण

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीच्या आतील खोलवरील जीवन अतिनील किरणे, लघुग्रहांच्या प्रभावापासून किंवा इतर आपत्तीजनक घटनांपासून संरक्षित आहे. हे वातावरण जीवनाच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीसाठी योग्य असू शकते. एक मध्यम तीव्रतेचा भूकंप हायड्रोजन उत्पन्न करु शकतो. जो अत्यंत तापमान आणि दबावाने पाणी आणि अल्ट्रामॅफिक खडकांच्या दरम्यान प्रतिक्रीये पासून तयार होतो. ही ऊर्जा खोल समुद्र आणि जमीनीच्या आता सुक्ष्म जीवांना जीवंत रहाण्यास मदत करु शकते. या शोधामुळे पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती आणि त्याचा विकास या संदर्भात नवीन सिद्धांत समोर येऊ शकतात.