
भारतासह जगभरातील देशांमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता जगातील भ्रष्ट देशांची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. ग्लोबल ट्रान्सपरन्सीने जारी केलेल्या या अहवालात युरोप आणि अमेरिकेत भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. मात्र 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये भारतात भ्रष्टाचाराची प्रकरणे घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 2025 मध्ये भारताचा स्कोअर सुधारला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत कितव्या स्थानावर आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
ग्लोबल ट्रान्सपरन्सीने जारी केलेल्या अहवालात डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. या ठिकाणी भ्रष्टाचाराची सर्वात कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर दक्षिण सुदान आणि सोमालिया हे जगातील सर्वात भ्रष्ट देश आहेत. ग्लोबल ट्रान्सपरन्सीने जगभरातील 180 देशांचा हा अहवाल प्रसिद्ध केला. यात सोमालिया आणि दक्षिण सुदान हे देश यादीत तळाला आघाडीवर आहेत.
ग्लोबल ट्रान्सपरन्सीने सादर केलेल्या भ्रष्टाचारावरील अहवालात फक्त 7 देशांचे स्कोअर 80 पेक्षा जास्त आहेत. तसेच युरोपियन देशांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि इटली सारख्या देशांच्या स्कोअरमध्ये घट दिसून आली आहे. युरोपात फक्त जर्मनीमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. ब्रिटन टॉप 20 देशांच्या यादीतून बाहेर आहे.
सर्वात कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेलाही फटका बसला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भ्रष्टाचाराला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र 2024 मध्ये अमेरिका भ्रष्टाचाराच्या बाबतीत जागतिक स्तरावर 28 व्या क्रमांकावर होता, तो आता 29 व्या क्रमांकावर घसरला आहे. चीनमधील भ्रष्टाचारातही घट झालेली नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत चीन 76 व्या क्रमांकावर आहे.
भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 2023 मध्ये भारत सर्वात कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांच्या यादीत 93 व्या क्रमांकावर होता. 2024 मध्ये भारत 92 क्रमांकावर आला होता, त्यानंतर आता यंदा भारत 91 व्या क्रमांकावर आला आहे. याचा अर्थ गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. असं असलं तरी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा खूप मागे आहे.